प्रलंबित सिंचन योजना कार्यान्वित करणार : खा.डॉ. भामरे

प्रलंबित सिंचन योजना कार्यान्वित करणार : खा.डॉ.  भामरे

मुंजवाड । वार्ताहर Munjvad

बागलाण तालुक्यातील ( Baglan Taluka )अनेक सिंचन योजनांचे ( Irrigation Scheme ) पाणी आरक्षित करण्यात आले आहे. निधीअभावी या योजना कार्यान्वित नसल्या तरी आगामी काळात केंद्र सरकारकडून पैसा उपलब्ध करून घेत या प्रलंबित सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन खा.डॉ. सुभाष भामरे ( MP. Dr. Subhash Bhamre )यांनी येथे बोलताना केले.

बागलाण तालुक्यातील नवे निरपूर गावाने व बागलाण तालुका मानव अधिकार संघटनेच्या वतीने करोनाकाळात गरीब-श्रीमंत असा कोणताही दुरावा न ठेवता ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकार्‍यांसह आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदी करोनाकाळात धाडसपूर्ण काम करणार्‍या घटकांचा ग्रामपंचायतीच्या वतीने करोना योद्धा म्हणून खा. डॉ. भामरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी मालेगाव बारा बलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष बंडूकाका बच्छाव होते. तसेच नवे निरपूर गावाला स्मार्ट व्हिलेज गावाचा दर्जा जिल्हा परिषदेने बहाल केल्याबद्दल ग्रामपंचायतीचे सरपंच शरद सूर्यवंशी व ग्रामसेवक अमोल देवरे यांचादेखील यावेळी सत्कार करण्यात आला.

करोनाचे संकट गल्ली ते दिल्लीपर्यंत भयावह ठरले. दुसर्‍या लाटेत शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात करोनाची तीव्रता अधिक असतानाही काही गावांनी प्रशासकीय यंत्रणेला बरोबर घेत आदर्शवत कार्य करत सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. हे कार्य निश्चितच अनुकरणीय व प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन खा. डॉ. भामरे यांनी बोलताना केले.

यावेळी मार्गदर्शन करताना बंडू बच्छाव यांनी करोनाने काय शिकवले याची जाणीव करून दिली. अडचणीच्या काळात स्वकियांपेक्षा परकीय मदतीला लवकर धावतात. मैत्री कोणाशी करायची व कोणाशी करू नये याचे परिपूर्ण शिक्षण करोनाने दिले. स्वार्थी व मतलबी लोकांपेक्षा प्रेम, जिव्हाळा, सहानुभूती दाखवून धाडस दाखवणार्‍या लोकांचे चेहरे समाजापुढे करोनाने स्पष्टपणे दाखवून दिल्याचे स्पष्ट केले.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष संजय देवरे, कृउबा संचालक संजय सोनवणे, रत्नमाला सूर्यवंशी, सचिव भास्कर तांबे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत अहिरराव, सुरेश मोरे, भाऊसाहेब सूर्यवंशी, केंद्रीय मानव अधिकार संघटनेचे तालुकाध्यक्ष भूषण बोरसे, जे. डी. पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी हेमंत अहिरराव, डॉ. राहुल सोनवणे, डॉ. गौरी सूर्यवंशी, डॉ. हसन अन्सारी, महेंद्र महाराव, डॉ. जगदीश वाघ, पोलीस प्रकाश जाधव, विलास सूर्यवंशी, एजाज मुल्ला यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र नवे-जुने निरपूर यांचा सन्मान करण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com