प्रलंबित सिंचन प्रकल्प मार्गी लावणार : खा. डॉ. भामरे
नाशिक

प्रलंबित सिंचन प्रकल्प मार्गी लावणार : खा. डॉ. भामरे

Abhay Puntambekar

सटाणा । प्रतिनिधी Satana

बागलाण तालुक्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्णत्वास यावेत यासाठी कटिबद्ध आहोत. आपल्या उर्वरित कार्यकाळात या प्रकल्पांची कामे पूर्णत्वास आलेली दिसून येतील, .बागलाण तालुक्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांबाबत माहिती देताना खा. डॉ. भामरे बोलत होते. तळवाडे भामेर पोहच कालवा, हरणबारी डावा कालवा, केळझर डावा कालवा, केळझर चारी क्र. ८ सुळे डावा कालवा या कालव्यांना यापूर्वीच निधी उपलब्ध होऊन प्रत्यक्ष कामे सुरू झाली आहेत. हरणबारी उजवा कालवा व केळझर चारी क्र. ८ तसेच अप्पर पुनद प्रकल्प या प्रकल्पांसाठी पाणी उपलब्ध होऊन सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. आगामी काळात अंतिम मंजुरीसाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ. भामरे यांनी स्पष्ट केले.

तळवाडे भामेर पोहच कालव्यासाठी २१ कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यात आला होता. केळझर डावा कालवा व केळझर चारी क्र. ८ या सिंचन प्रकल्पांची सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त होऊन ८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. पुढील केळझर चारी क्र. ८ चे काम पूर्णत्वास येत आहे. कान्हेरी नदीवर पाईप टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. हरणबारी डावा कालवा बंदिस्त पाईपलाईनद्वारे घेण्याचे शासनाचे धोरण असून नवीन अंदाजपत्रक करून सदर कामांसाठी पाईप टाकण्यासंदर्भात आराखडा मेरी विभागाने मंजूर केला आहे, अशी माहिती. डॉ. भामरे यांनी दिली.

हरणबारी उजव्या कालव्यांना पाणी उपलब्धतेसाठी साल्हेर-वाघंबा वळण योजना असे तीन वळण बंधारे मंजूर करून यासाठी निधी उपलब्ध केला आहे. या योजनेच्या माध्यमातून वाढीव चारीसाठी १४.३५ द.ल.घ.फूट व हरणबारी उजव्या कालव्यासाठी ३७.६६ द.ल.घ.फूट पाणी उपलब्ध होईल. हरणबारी उजवा कालवा निताणेपासून ते वायगाव, सातमानेपर्यंत तर केळझर चारी क्र. ८ चे पाणी भाक्षी, मुळाणेपासून अजमीर सौंदाणे, वायगावपर्यंत पोहोचवण्यासाठी मंजुरी प्रस्तावित आहे. अप्पर पुनद प्रकल्पदेखील लवकरच मार्गी लागेल, असे खा. डॉ. भामरे यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com