पुणे विद्यापीठ
पुणे विद्यापीठ
नाशिक

परीक्षांच्या गुणांत त्रुटी आढळल्यास प्राध्यापकांना दंड

परीक्षा विभागाचा निर्णय

Gokul Pawar

Gokul Pawar

पुणे | Pune

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध परीक्षांच्या अंतर्गत गुणांत त्रुटी आढळल्यास महाविद्यालय आणि संबंधित प्राध्यापकांना संयुक्‍तपणे प्रति विद्यार्थी एक हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने घेतला आहे.

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी या संबंधीचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

अंतर्गत गुणांसंदर्भात तीनपेक्षा जास्त वेळेस त्रुटी आढळून आल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होणार, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे आता शिक्षक व महाविद्यालयांना योग्य पद्धतीने अंतर्गत गुण भरताना अधिक दक्ष राहणे लागणार आहे.

मार्क्स दिल्यावर त्यावर स्वाक्षरी करताना संबंधित प्राध्यापकांनी ‘वरील सर्व गुण मी पूर्णपणे वाचले असून ते बरोबर असल्याची खात्री केलेली आहे’, असे हमीपत्र देणे आवश्‍यक आहे. त्याचप्रमाणे सदर हमीपत्रावर महाविद्यालयाच्या प्राचार्यांची स्वाक्षरी बंधनकारक असेल.

विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण योग्य पद्धतीने भरण्याची संपूर्ण जबाबदारी संयुक्‍तपणे विषय प्राध्यापक व महाविद्यालयांची असेल. त्यात त्रुटी निदर्शनास आल्यास दंड आकारला जाणार आहे.

दरम्यान, काही विद्यार्थी परीक्षा फी भरु शकले नसल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अनेक महाविद्यालयांचे संपूर्ण निकालच अडवल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी समोर आला होता. पदवीचे शेकडो विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने अनेक महाविद्यालयांतील पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षातील सर्वच विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवल्याची माहिती आहे.

विद्यापीठाने पदवीच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षेसाठी शुल्क भरण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना दिल्या होत्या. कोरोनामुळे परीक्षा शुल्क भरण्यास वेळोवेळी मुदतवाढही देण्यात आली आहे. त्याच दरम्यान करोनामुळे अंतिम वर्ष वगळता सर्व विद्यार्थ्यांचे निकाल मागील गुणांवरून निकाल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी शुल्कच भरले नाही, असं सांगितलं जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com