‘त्या’ रकमेतून पावणेदाेन महिन्यांचे वेतन द्या
नाशिक

‘त्या’ रकमेतून पावणेदाेन महिन्यांचे वेतन द्या

इंटकची राज्य परिवहनकडे मागणी

Bharat Pagare

नाशिक | Nashik

एस. टी. कर्मचा-यांच्या वेतनाकरीता नुकताच ५५० कोटी रूपयांचा निधी सवलत मूल्यांच्या प्रतिपूर्तीपोटी अग्रीम म्हणून देण्यात आला आहे. या रकमेतून एसटी कर्मचा-यांचे मार्च महिन्याचे २५% मे महिन्याचे ५०% व जून महिन्याचे संपूर्ण वेतन देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड व सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी केली आहे.

शासन निर्णयानुसार एस. टी. कर्मचा-यांचे मार्च महिन्याचे ७५ टक्के वेतन दिलेले होते, परंतु शासनाने मार्च २०२० चे उर्वरीत वेतन दुस-या टप्प्यात प्रदान करण्यासंदर्भात निर्णय घेतला. या शासन निर्णयानुसार मार्च २०२० चे उर्वरीत २५ टक्के वेतन व माहे मे महिन्याचे वेतन ५० टक्के देणे बाकी आहे. तसेच जून महिन्याचे वेतन अद्यापपर्यंत देण्यात आलेले नाही. त्यामुळे कर्मचा-यांच्या मुलभूत गरजा भागविणे अशक्य झालेे असून त्यांची उपासमारी होत आहे.

शासनाने विविध सवलतीच्या प्रतिपूर्तीपोटी अग्रीम म्हणून एस.टी. कर्मचा-यांच्या वेतनाकरीता ५५० कोटी रूपये मंजुर केले आहेत. या रकमेतून कर्मचा-यांच्या वेतनाशिवाय इतरत्र खर्च करण्यात येऊ नये. एका महिन्याच्या वेतनासाठी २५० कोटी रूपये लागतात तर ५५० कोटी रूपयांमधून पावणे दोन महिन्याचे वेतन करण्यास अडचण येणार नाही.

तसेच ५५० कोटी रूपये हे सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षाच्या यापुढे देय होणा-या सवलत मूल्यांच्या रकमेतून वेळोवेळी समायोजित करण्यात येणार आहे, म्हणजेच शासनाने एसटी कोणतेही अर्थसहाय्य केलेले नसल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड व सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी केला आहे.

अर्थसहाय्य द्या

भविष्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी एसटी महामंडळास इतर राज्याप्रमाणे अर्थसहाय्य द्यावे. महामंडळ आर्थिकदृष्ट्या मजबूत केल्याशिवाय सर्वसामन्यांच्या जीवनवाहीनीचे अस्तित्व धोक्यात आहे. त्यामुळे शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी म्हटले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com