शासकीय आरोग्यसेवांचा रुग्णांनी लाभ घ्यावा : कृषीमंत्री भुसे

रुग्णवाहिकांचे लोकार्पण
शासकीय आरोग्यसेवांचा रुग्णांनी लाभ घ्यावा : कृषीमंत्री भुसे

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

ग्रामीण व दुर्गम भागातील गरोदर माता, आजारी बालके व इतर गंभीर व्याधीग्रस्त रुग्णांना तत्काळ आरोग्यसेवा उपलब्ध होण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभागातर्फे ( Health Department ) मोफत रुग्णवाहिका ( Ambulance ) उपलब्ध करण्यात आल्या असून रुग्णांनी टोल फ्री क्रमांक 102 वर संपर्क साधून या सेवेचा लाभ घ्यावा. प्राथमिक आरोग्य केंद्रांनी देखील ही सेवा तत्काळ उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन कृषीमंत्री दादा भुसे ( Agriculture Minister Dada Bhuse ) यांनी केले.

आयुष्मान भारत योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, जननी-शिशू सुरक्षा कार्यक्रम व राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा 102 अंतर्गत तालुक्यातील करंजगव्हाण, सावतावाडी वडनेर, रावळगाव विभागासाठी ना. भुसे यांच्या विशेष प्रयत्नातून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तीन रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या असून त्यांचे लोकार्पण ना. भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ना. भुसे यांनी संबंधित आरोग्य केंद्रांच्या अधिकार्‍यांकडे रुग्णवाहिकांच्या चाव्या सुपूर्द केल्या.

ग्रामीण भागातील रुग्णालयात जननी-शिशू सुरक्षा कार्यक्रमांतर्गत गरोदर मातेस व एक वर्षांखालील आजारी बालकास मिळणार्‍या सेवांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासह त्यांना वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याची शासन व आरोग्य विभागाची जबाबदारी आहे. यासाठी संपूर्ण भारतात जननी सुरक्षा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली असून ग्रामीण भागातील आरोग्य सुधारण्यासह गरोदर माता व बालांना वेळीच उपचार मिळण्यास मदत होईल, असे ना भुसे यांनी सांगितले.

कार्यक्रमास उपमहापौर नीलेश आहेर, माजी जि.प. सदस्य समाधान हिरे, माजी पं.स. सदस्य कृष्णा ठाकरे, भगवान मालपुरे, शिवसेना तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव, शहरप्रमुख नगरसेवक राजाराम जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश सोनवणे, वडनेर सरपंच अजिंक्य ठाकरे, उपसरपंच प्रवीण जैन, सावतावाडी सरपंच दीपक मोहिते, रावळगाव सरपंच महेश पवार, उपसरपंच भरत आखाडे, शरद कासार, संजय ढिवरे आदींसह परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, पदाधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्यधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.