ऑक्सिजन बेड नसल्याने रुग्णांचे हाल
करोना अपडेट

ऑक्सिजन बेड नसल्याने रुग्णांचे हाल

करोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांनी फोडला टाहो

कळवण । प्रतिनिधी

रेमडेसिवीर इंजेक्शन कुठेच भेटत नाही. डॉक्टर सांगतात इंजेक्शन देणे गरजेचे आहे. कोविड सेंटरचे उबंरठे झिजवले मात्र अभोणा, मानूरला ऑक्सिजन बेड उपलब्ध झाला नाही. वेळेत बेड मिळाला नाही तर, त्याच्या जिवाला धोका पोहोचेल. त्यामुळे ऑक्सिजन बेड उपलब्ध करुन द्या असा टाहो कळवण तालुक्यातील करोना बाधित रुग्णांचे नातेवाईक फोडत असल्याचे चित्र तालुक्यात आहे तर दुसरीकडे रेमडिसीव्हर इंजेक्शन व ऑक्सिजन सिलेंडर मिळत नसल्याने खासगी कोविड सेंटर बंद होण्याच्या मार्गांवर आहे.

कळवण तालुक्यातील प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा कोविड सेंटरला ऑक्सिजन, वैद्यकीय यंत्रणासह मनुष्यबळ पुरविण्यात अपयशी ठरली त्यामुळे यंत्रणा व आरोग्य सेवा द्या, नाहीतर कोविड सेंटरला कुलूप लावण्याचा इशारा आमदार नितीन पवार यांनी दोन दिवसापूर्वी दिला तरी तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा अद्याप गप्प असल्यामुळे ऑक्सिजन अभावी रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. कळवण तालुक्यातील दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण संख्या 750 पर्यंत जाऊन पोहचली आहे

. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे तालुक्यातील वैद्यकीय उपचार यंत्रणा कमी पडत आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडरची गरज आहे. परंतु कळवण तालुक्यातील अभोणा व मानूर या शासकीय कोविड सेंटर आणि कळवण शहरातील खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या प्रकृतीत बिघाड होत असल्यामुळे नातेवाईक चिंताग्रस्त झाले आहे. खासगी रुग्णालयाला ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने सिलेंडरच्या शोधात रोज देवळा, सटाणा, मालेगाव, पिंपळगाव बसवंत, नाशिक, सिन्नर, विल्होळी येथे त्यांची भटकंती चालू आहे.

उपलब्ध सिलेंडरवर रुग्णांना ऑक्सिजन दिला जातो, मात्र ऑक्सिजन सिलेंडर आणि रेमडिसीव्हर वेळेवर उपलब्ध झालेच नाहीतर खासगी रुग्णालय बंद करुन घेण्याच्या मनस्थिती रुग्णालयांची झाली आहे. करोना काळात डॉक्टर चांगल्या पद्धतीने काम करत असले तरी त्याच्या पुढे अनेक समस्या येत असून रुग्णांना ऑक्सिजन बेडची संख्या कमी पडत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातून येणारे करोना रुग्णांना वाचविण्यासाठी ऑक्सिजन बेड वाढवण्यासाठी मागणी होत आहे. सध्या अभोणा, मानूर येथील कोविड सेंटरमध्ये बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्ण प्रतीक्षा यादीत आहे.

परंतु उपचारासाठी येणार्‍या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रुग्णांना बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. त्यांना खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो मात्र खासगी रुग्णालयात देखील ऑक्सिजन अभावी रुग्ण दाखल करुन घेतले जात नाही. बेड आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे गरीब रुग्णांचे हाल होत आहे. त्यामुळे बेड व ऑक्सिजन सिलेंडर बेडची संख्या वाढवणे गरजेचे झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com