नाशिकरोड । प्रतिनिधी

सन 1948 साली स्थापन झालेल्या नाशिकरोडच्या आर्टिलरी सेंटरमध्ये तोफा चालवण्याचे (गनर) प्रशिक्षण दिले जाते. भारतातील हे सर्वात मोठे प्रशिक्षण केंद्र आहे. 42 आठवड्यांच्या प्रशिक्षण कालावधीत देशभरातून आलेले पाच ते सहा हजार जवान प्रशिक्षण घेतात. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 369 जवानांना 7 एप्रिल रोजी झालेल्या दीक्षांत समारंभात गौरवण्यात आले.

आर्टिलरी सेंटरचे एडीजी मेजर जनरल पी. आर. मुरली यांनी संचलनाची पाहणी करून सलामी स्वीकारला. हे जवान येथील दर्जा कायम राखत भारतीय लष्कराची परंपरा अधिक उज्ज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जवानांच्या धैर्याचे, एकनिष्ठतेचे त्यांनी कौतुक केले. भारतीय लष्कराच्या गौरवशाली परंपरेचा आणि व्यावसायिकतेचा पाईक होण्याची पात्रता जवानांनी अंगी बाणावी, असे आवाहन त्यांनी केले.

या तुकडीतील उत्कृष्ट कामगिरी करणार्या जवानांना करंडक देऊन गौरवण्यात आले. सुखजिंदर सिंह हे सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी ठरले. 48 आठवड्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर जवानांना भारतीय लष्करात समाविष्ट केले जाते. त्यांना गनर्स किंवा तोपची म्हणून ओळखले जाते. आधुनिक युद्धाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी बलाढ्य तोफ, रॉकेट, क्षेपणास्त्र, रडार हाताळण्याचे प्रशिक्षण या जवानांना देण्यात आले.

प्रशिक्षण कालावधीत एक आठवडा मूलभूत सैन्य प्रशिक्षणाचा (बीएमटी) समावेश होता. ज्यामध्ये प्रामुख्याने शारीरिक, शस्त्रास्त्र प्रशिक्षण आणि नकाशा वाचन आदींचा समावेश होता. बीएमटी पूर्ण झाल्यावर आणि अल्प विश्रांतीनंतर जवानांना अॅडव्हान्स मिलिटरी ट्रेनिंग (एएमटी) देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या तुकडीने पासिंग आऊट परेडमध्ये सहभाग घेतला. खडतर प्रशिक्षणानंतर देशाची सेवा करण्यासाठी हे जवान सज्ज झाले आहेत. त्यांचे पालक, प्रशिक्षक व मान्यवर उपस्थित होते.