
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गेल्या वर्षभरापासून बंद असलेली गोदावरी एक्स्प्रेस (Godavari Express) सुरु होण्याबाबत प्रवाशांमध्ये चर्चा सुरु आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून गोदावरी सुरु करण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोदावरीविषयी सुरु असलेली चर्चा ही केवळ चर्चाच आहे...
दीड वर्षापासून गोदावरी एकदाही मनमाड (Manmad) ते मुंबई (Mumbai) दरम्यान धावलेली नाही. जिल्ह्यातील प्रवाशांसाठी जीवनवाहिनी असलेली ही गाडी धावणार तरी कधी अशी आर्त भावना प्रवासी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.
कोरोनामुळे (Corona) रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. त्यावेळी मनमाड येथून सुटणार्या पंचवटी व गोदावरी एक्स्प्रेस थांबविण्यात आल्या.
लांब पल्याच्या गाड्या सुरु होऊनदेखील या दोन्ही गाड्या सुरु होत नसल्याने नाशिकमधील हजारो नोकरदारांनी पंचवटी एक्स्प्रेस (Panchavati Express) सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार केला.
अखेर प्रशासनाने कामगारांची संख्या व जिल्ह्यातील प्रवासी संख्या पाहता पंचवटी एक्स्प्रेस सुरु केली. पंचवटी सुरु झाल्यानंतर गोदावरी एक्स्प्रेस काही दिवसांनी सुरु होइल, अशी अपेक्षा जिल्हावासियांकडून व्यक्त होत होती, मात्र ही अपेक्षा फोलच ठरली आहे.
रेल्वे प्रशासनाकडून गोदावरी सुरु करण्याबाबत अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही, महाराष्ट्रातून धावणार्या नागपूर, जनशताब्दी, तपोवण, जनशत्बादी, दादर-शिर्डी या स्थानिक गाड्यांसह परराज्यातून येणार्या गोरखपूर एक्स्प्रेस, लखनऊ-पुष्कप एक्स्प्रेस, हटीया, गोदान, तुलसी एक्स्प्रेस आदींसह अनेक लांब पल्याच्या गाड्या रोज धावत आहे.
गोदावरी बंद असल्याने मनमाड, लासलगाव (Lasalgaon) येथून नोकरीवर येणारे कामगार व प्रवाशांसाठी महत्वाची गाडी आहे. ही गाडी अद्याप बंद असल्याने अनेकांना महामार्गाद्वारे किंवा दूसर्या रेल्वे गाड्यातून नाइलाजस्तव प्रवास करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने जिल्ह्यातील प्रवासी वर्गाचे होणारे हाल पाहून तत्काळ गोदावरी एक्स्प्रेस सुरु करण्याची मागणी नागरिक करीत आहेत..