
देवळा | वार्ताहर | Deola
जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यातील तब्बल १९ लाख सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसत एल्गार पुकारला आहे. या संपाचा भाग म्हणून, देवळा येथेही सरकारी कर्मचाऱ्यांनी या राज्यव्यापी संपाला पाठींबा दर्शवला.
आज दि. १४ मार्च रोजी सकाळी, येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरवात झाली.
दरम्यान, आमदारांना पेन्शन मिळते, मग आम्हाला का नाही?, “कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही”, ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’, ‘पेन्शन द्या, नाही तर टेन्शन देऊ’ अशा आवेशपूर्ण घोषणा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिल्या.
त्याबरोबरच, देवळा येथील तहसीलदार व पोलीस निरीक्षक (Tehsildar and Inspector of Police) यांना विविध संघटनाच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलन स्थळी पाठींबा दर्शविण्यासाठी कृषी, शिक्षण, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, माध्यमिक शिक्षक, आदिवासी विकास विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.