पालकांनी घाबरू नये; मनपाचे आवाहन

पालकांनी घाबरू नये; मनपाचे आवाहन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मुंबईसह ( Mumbai ) काही शहरात गोवर (Measles)या आजाराची लागण लहान मुलांमध्ये पसरत आहे. हा आजार मुख्यतः लहान मुलांमध्ये पाहायला मिळतो. विषाणूपासून होणारा हा संसर्ग खोकण्यातून किंवा शिंकण्यातून होतो. नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून याबाबत जनजागृती करण्यात येत असून मुलांमध्ये काही लक्षणे आढळल्यास पालकांनी घाबरून जाऊ नये, या आजाराची संपूर्ण माहिती डॉक्टरांना द्यावी, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन उपचार करून घ्यावेत, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाने केले आहे.

गोवरची बाधा कोणत्याही वयोगटात होण्याची शक्यता असते. गोवर झालेल्या व्यक्तीकडून हा आजार अंगावर लाल पुरळ येण्याच्या तीन दिवस आधी आणि चार ते सहा दिवसा नंतर दुसर्‍या व्यक्तीकडे संक्रमित होतो. गोवर झालेल्या रुग्णामध्ये ‘अ’ जीवनसत्वाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अंधत्व येऊ शकते. गोवर सोबत होणारा न्यूमोनिया हा बर्‍याच वेळा तीव्र स्वरूपाचा असतो.

यामध्ये रुग्णाच्या श्वसनलिकेला सूज येऊन रुग्णांना श्वसन प्रकियेत त्रास होण्याची शक्यता असते. कुपोषित बालकांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आढळते. गोवर झालेल्या रुग्णांमध्ये तीव्र ताप, शरीरावर लाल पुरळ, सर्दी, खोकला, डोळे लाल होणे अशी लक्षणे दिसतात. बालकांचे वय 9 महिने पूर्ण झाल्यानंतर पाहिला डोस घेण्यास हरकत नाही. दुसरा डोस 16 ते 24 महिने झाल्यावर घेण्यात यावा. तसेच ज्या बालकांचे लसीकरण झाले नसेल तर बालकाचे वय वर्ष 5 पर्यंत असेल तर गोवर रुबेलाचे लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.

या आजाराचे निदान झाल्यास त्या मुलांना शाळेत पाठवू नये. आजार वेगाने प्रसार करणारा आहे. वेगळ्या खोलीत ठेवावे. भरपूर विश्रांती घ्यायला लावणे. बहुतांशवेळा मुले लहान असल्याने एकट्याला खोलीत ठेवणे शक्य नसते. प्रौढांना या आजाराचा फारसा धोका नसतो. आजारी मुलांना मात्र इतर मुलांबरोबर मिसळू देऊ नये. बालकांना वरीलप्रमाणे काही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.

- डॉ. अजिता साळुंके, मनपा वैद्यकीय अधिकारी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com