बसस्थानकांवर ‘पार्सल स्टोअर रूम’ साकारणार

एसटीकडून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न
बसस्थानकांवर ‘पार्सल स्टोअर रूम’ साकारणार
बस स्थानक

नाशिक | प्रतिनिधी

लहान माेठे उद्याेग, व्यापारी, शेतकरी, नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन एसटी महामंडळाने किरकोळ वाहतूक सुरू करण्याचा विचार सुरू केला आहे. त्यासाठी लवकरच बसस्थानकांवर ‘पार्सल स्टोअर रूम’ साकारण्यात येणार आहे. त्यासाठी चाचपणी सुरू करण्यात आली अाहे.

करोनामुळे बसेस ठप्प झाल्या आहेत. यात महामंडळाने उत्पन्नाचे साधन म्हणून एसटीच्या बसेस ट्रकमध्ये रूपांतरित करून माल वाहतुकीला सुरुवात केली आहे. परंतु सर्वांनाच एसटीचा ट्रक बुक करणे शक्य नसते. एखादा दोन टन माल असल्यास त्यांची अडचण होते. होणारी गैरसोय लक्षात घेऊन एसटी महामंडळाकडून किरकोळ वाहतूक सुरू करण्याचा विचार सुरू केला जात आहे. त्यासाठी लवकरच बसस्थानकांवर ‘पार्सल स्टोअर रूम’ साकारले जाणार आहे.

एसटी महामंडळाचे उत्पन्न करोना संकटामुळे ठप्प झाले आहे. यातून सावरण्यासाठी माल वाहतुकीचा पर्याय शोधून काढण्यात आला आहे. खासगी वाहतूकदारांच्या तुलनेत एसटीच्या माल वाहतुकीचे दर परवडणारे असल्यामुळे एसटीच्या माल वाहतुकीला चांगला प्रतिसादही मिळत आहे. एसटीच्या अधिकाऱ्यांनी ‘पार्ट लोड’ म्हणजे किरकोळ वाहतूक सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी एसटीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विभागीय स्तरावर सर्वेक्षण करावे असे निर्देश एसची महामंडळाच्या मालवाहतूक खात्याने दिले आहेत.

व्यापाऱ्यांचा किरकोळ माल या पार्सल स्टोअर रूममध्ये ठेवून तो संबंधित ठिकाणी रवाना करण्यात येईल. तसेच इतर ठिकाणांवरून आलेला मालही स्थानिक व्यापारी या पार्सल स्टोअर रूममधून नेऊ शकणार आहेत. किरकोळ वाहतूक सुरू केल्यानंतर एसटीच्या माल वाहतुकीला राज्यभरात अजून प्रतिसाद मिळून एसटीचे उत्पन्न वाढणार असल्याचा दावा एसटीकडून केला जात आहे.

एसटीच्या मालवाहतुकने केवळ दोन महिन्यांत ३.१५ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळवले आहे. यातून माल वाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळताे आहे. त्यामुळे ट्रकची संख्या कमी पडत आहे. लवकरच आणखी एसटी बसेसचे ट्रकमध्ये रूपांतर करून किरकोळ माल वाहतुकीला सुरुवात केली जाणार आहे.

Related Stories

No stories found.