
उमराणे | प्रतिनिधी
मालेगाव येथून नाशिककडे जात असलेल्या एस.टी. बसचा मागील टायर फुटल्याने मोठा आवाज झाल्याने घाबरलेल्या प्रवासी महिलेने चालत्या बसमधून रस्त्यावर उडी मारल्याने ती गंभीररित्या जखमी झाली. मुंबई-आग्रा महामार्गावर ब्रम्हराज पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली.
जीर्ण झालेल्या एस.टी. बसेसला अपघात होण्यासह टायर फुटण्याचे प्रकार सातत्याने घडत असून प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. मात्र, महामंडळातर्फे या जुनाट बसेस बदलल्या जात नसल्याबद्दल यावेळी प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
शारदीय नवरात्रोत्सव सुरू असल्याने बसमध्ये प्रवाशांची विशेषत: महिलांची गर्दी वाढली आहे. काल दुपारी 3 वाजे दरम्यान नांदगाव डेपोची ज्यादा बस ( एमएच-१४-बीटी-०७३७) ही मालेगावहून नाशिककडे जात असतांना उमराणे गावाजवळील उड्डाणपुलाजवळ आली असता बसचे वाहक बाजूकडील पाठीमागील टायर फुटल्याने जोरात आवाज झाला. त्यामुळे सर्व प्रवासी घाबरून गेले.
चालकाने बस हळू करताच दरवाजाजवळ उभ्या असलेल्या घोटी तालुका इगतपुरी येथील सुनिता शंकर खतिले (३५) या महिलेने घाबरून दरवाजा उघडून उडी मारली. सदर महिला रस्त्यावर पडल्याने तिच्या डोक्याला जोरात मार लागल्याने ती गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाली. प्रवासी वाहक, चालक व आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तात्काळ १०८ ला फोन केला. परंतू प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे सौंदाणे येथील सामाजिक कार्यकर्ते चेतन पवार रुग्णवाहिकेस फोन केला. वाहक मोठाभाऊ पवार यांनी त्वरित रुग्णवाहिका आणून त्या महिलेस तत्काळ मालेगाव येथे प्रयास हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
बसचा टायर फुटल्याने सर्व प्रवाशी दुसऱ्या बसची वाट पाहत होते. परंतू मालेगावहून नाशिककडे जात असलेल्या बसेस प्रवाशांना न घेता निघून जात होत्या. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.