अत्यावश्यक सेवेसाठी ‘पंचवटी सुपरफास्ट एक्स्प्रेस’ सुरू करावी
नाशिक

अत्यावश्यक सेवेसाठी ‘पंचवटी सुपरफास्ट एक्स्प्रेस’ सुरू करावी

खा.हेमंत गोडसे यांची रेल्वे प्रशासनाकडे आग्रही मागणी

Abhay Puntambekar

देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

करोना संकटकाळात सुरक्षेच्या कारणास्तव लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे प्रवासी वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. यात नाशिककरांचा महत्त्वाचा घटक असलेली पंचवटी सुपरफास्ट एक्स्प्रेसदेखील बंद करण्यात आली.

मात्र अत्यावश्यक सेवेतील चाकरमान्यांना दररोज मुंबईत जावे लागत असल्याने त्यांच्या सोयीसाठी पंचवटी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी आग्रही मागणी खा.हेमंत गोडसे यांनी मध्य रेल्वे विभागाचे डिव्हीजनल प्रबंधक शैलभ गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदरची मागणी न्यायिक असून ‘पंचवटी’ लवकरच सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही याप्रसंगी रेल्वेचे महाप्रबंधक दिनेश वशिष्ठ यांनी दिली.

अत्यावश्यक सेवेतील हजारो सेवकांना दररोज नोकरीनिमित्त मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई आदी शहराकडे येत असतात. त्यांना येण्या-जाण्यासाठी सोय नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांना आर्थिक भुर्दंड सहन करत मुंबई गाठावी लागत होती. यामुळे पैसे व वेळेचादेखील अपव्यय होत होता.

त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील सेवकांना अप-डाऊन करणार्‍यांसाठी महत्त्वाचा घटक असलेली पंचवटी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करावी, अशी मागणी चाकरमान्यांसह जिल्हावासियांकडून सतत करण्यात येत होती. प्रवाशांची मागणीची दखल घेत खा.गोडसे यांनी मध्य रेल्वे प्रशासनाची भेट घेत पंचवटी सुपरफास्ट एक्स्प्रेस पुन्हा पूर्ववत करण्यासदंर्भात चर्चा केली.

यावेळी उपमहाप्रबंधक दिनेश वशिष्ठ यांनी निवेदन स्वीकारत याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com