रुग्णसंख्या घटविण्यात पळसे गावाला यश

रुग्णसंख्या घटविण्यात पळसे गावाला यश

देवळाली कॅम्प । वार्ताहर

राज्यासह जिल्ह्यात करोनाच्या दुसर्‍या लाटेतील रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय बनला असताना संपुर्ण गावाने नोंदविलेल्या सहभागाने करोना रुग्णांची संख्या घटविण्यात पळसे गावला यश मिळाले आहे. पूर्ण बरे झालेल्या रुग्णांना वृक्षाचे रोप व पत्र देऊन निरोप दिला जात आहे.

नाशिक तालुक्यातील पूर्व भागातील पळसे गावात मागील महिन्यात करोनाने हाहाकार माजविला होता. संपूर्ण गाव लॉकडाऊन करण्यात येऊन या लढाईत सर्व घटक सहभागी झाले. घरात विलगीकरण करताना स्वतंत्रपणे खोली आणि शौचालय गरजेचे आहे. ही सुविधा नसलेल्या रुग्णांना ग्रामपालिकेच्या वतीने संस्थात्मक विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात येऊन उपचार देण्यात आले. पळसे ग्रामविकास मंडळ संचलित संत आईसाहेब विद्यालयात चार खोल्यांमध्ये हा कक्ष कार्यन्वित आहे.

विलगीकरण कक्षात रुग्णांना शयनकक्षासह जेवण, चहापाणी, अंडी, सॅनिटायझर, वाफ घेण्यासाठी यंत्र आदी सुविधा मोफत पुरविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे भोजन, नाश्ता, चहा, पाणी हा खर्च ग्रामपालिका सदस्यांच्या स्व वर्गणीतून करण्यात येतो. ग्रा.प. सदस्या. प्रिया गायधनी या स्वतः आपल्या घरून रुग्णांना जेवणाचे डबे पुरवत आहेत. तर माजी सरपंच नवनाथ गायधनी, सरपंच सुरेखा गायधनी, संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत गायखे, पो.पा. सुनील गायधनी, उपसरपंच दिलीप गायधनी, मनसेचे तालुकाध्यक्ष सुनील गायधनी आदींसह सर्व सदस्य रुग्णांची विशेष काळजी घेत आहेत.

दिवसातून दोनदा पाहणी

शिंदे येथील आरोग्य अधिकारी वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्र अधिकारी किरण गायकवाड, राहुल पैठणे, देशपांडे, सतीश अहिरराव हे दिवसातून दोनदा भेटी देऊन रुग्णांवर उपचार करत आहेत. तर खासगी शल्यविशारद डॉ. भास्कर गुप्ता, डॉ. ऋषीकेश कोठावदे, डॉ. जाधव हे सुद्धा भेट देऊन मार्गदर्शन करत आहेत.

सर्व्हे येतोय कामी

जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्ताराधिकारी बी.डी. जगताप, ग्रामविकास अधिकारी उत्तम शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्ती व प्राथमिक शाळेचे शिक्षक प्रत्येक घरात जाऊन सर्व्हे करत आहेत. त्यामुळे प्राथमिक लक्षणे असलेल्या रुग्णांना तत्काळ तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला जात आहे. पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या घराच्या परिसरात जंतुनाशक फवारणी केली जात आहे. पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. सारिका बारी यांनीही येथे भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com