'पक्ष' की बात! आम आदमी पार्टी

'पक्ष' की बात! आम आदमी पार्टी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिकेच्या निवडणुकीच्या (NMC Elections) रणधुमाळीला जरी अवधी असला तरी मात्र निवडणुकीचे वेध इच्छुक आणि सध्याच्याही उमेदवारांना लागले आहेत. परंतु प्रभाग रचना आणि आरक्षण जोपर्यंत अधिकृतरीत्या जाहीर होत नाही तोपर्यंत पक्षीयस्तरावर घडामोडी यात इच्छुकांच्या मुलाखती, वचननाम्याच्या दृष्टीने विकासाचे मुद्दे तयार करणे, लोकांच्या भेटीगाठींना उघड नसला तरी वेग आला आहे...

अशात आम आदमी पक्षाची (Aam Aadmi Party) 26 नोव्हेंबर 2012 मध्ये दिल्लीतील जंतरमंतर येथे अधिकृत स्थापना झाल्यानंतर नाशिकमधील 2014 लोकसभेच्या एकमेव निवडणुकीनंतर 2022 मध्ये होणार्‍या महापालिकेच्या निवडणुकीसाठी आप पहिल्यांदाच प्रत्यक्ष रिंगणात असेल. त्यातही महापालिकेच्या सर्व 133 जागांवर उमेदवार देण्याच्या तयारीने आआपची मोर्चेबांधणी जवळपास निश्चित झाल्याचे समजते.

दरम्यान, दिल्लीतील निवडणुकांच्या वातावरणापेक्षा महाराष्ट्रातील निवडणुकांची गणिते, समीकरणे, येथील प्रतिस्पर्धी पक्षीय राजकारण यात बरीच तफावत आहे. असे असले तरी महाराष्ट्र आआपाच्या समितीने निर्णय घेत जवळपास महापालिका निवणुकीसाठी तयारीच्या दृष्टीने रणनीती आखली आहे. त्यातच नाशिक महापालिकेसाठी दिल्ली मॉडेलवर व्यूहरचना तयार करण्यात आली आहे.

त्यानुसार दिल्ली मॉडेलच्या (Delhi Model) धर्तीवर विद्यार्थ्यांना खासगी शाळेकडून शासकीय शाळांकडे वळवण्याच्या दृष्टीने तसेच पालकांना आपल्या मुलांना खासगी शाळेत टाकण्याची वेळ येणारं नाही अशा दर्जा वाढवणार्‍या नाशिक महापालिकाच्या शाळेचा विकास, त्यासाठी महापालिकेच्या शाळांचे बजेटिंग, त्याशिवाय आरोग्य व्यवस्था सुधारणा करण्यासोबत सरकारी दवाखाने वाढवणे तसेच जागोजागी मोहल्ला क्लिनिक, घरपट्टी हाफ आणि 20 हजार लि.पर्यंत प्रतिकुटुंब पाणीपट्टी माफ हा नारा, तर लोकसंख्येनुसार महापालिका क्षेत्रात महिलांसाठी खास स्वच्छतागृह या मुख्य मुद्यांना घेऊन तसेच इतर अनेक शहर विकासाचे मुद्दे विकासनाम्यात जाहीर करण्यात येणार आहेत.

याशिवाय कमी बजेटमध्ये विकासकामे कशी देणार यासाठी भ्रष्टाचारमुक्त राजकारण हाही नारा देत त्या पद्धतीने काम करण्यावर भर देणात येणार असल्याचे पक्षाने जाहीर केले आहे. याशिवाय निवडणूक ही पूर्णपणे स्थानिक मुद्यांवर लढणार असल्याचे सांगितले असेल तरी पक्षाचे मोठे व प्रमुख नेते निवडणूक प्रचारादरम्यान शहरात येऊन लोकांशी चर्चा करणार आहेत. त्यादरम्यान काही सभांचेही नियोजन करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. असे असले तरी नाशिकच्या महापालिकेसाठी राज्याच्या समिती निर्णयानुसार जितेंद्र भावे हे प्रमुख चेहरा म्हणून सूत्र सांभाळताना दिसतील.

यावेळी पक्षाकडून निवडणुकीसाठी देण्यात येणारे उमेदवार हे पक्षाची ध्येय धोरणे पोहोचवणारे लोक, समाजासाठी प्रामाणिक काम करणारे कार्यकर्ते यांच्यासोबत इतर विरोधी पक्षातील तळागळातील मेहनती असून कायम डावलेले गेलेले कार्यकर्ते यांच्यातून निवडण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने घराणेशाहीमुक्त, अनधिकृत धंदे चालवणार्‍या लोकांना टाळण्यात आल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. हे करताना पक्षाकडून करप्ट, क्रिमिनल आणि कम्युनल पार्श्वभूमी असणार्‍याना तिकीट देताना पूर्णपणे डावलण्यात येत आहे.

कारण पक्षाचे कमी खर्चात निवडणूक लढवण्याचे धोरण राहिले आहे. त्यामुळे उमेदवाराचा कमी खर्च आणि पैसा खर्च होणार नाही त्यामुळे निवडून आल्यावर वसूल करण्याचा प्रश्न नसल्यामुळे भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्यासाठी आतापासूनच पक्षाने नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांचे दोन पाय आणि स्वस्तात छापलेले ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट छापील पत्रक हे जनता संवादाचे माध्यम ठेवले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com