साहित्य संमेलनात प्रथमच चित्र, शिल्प प्रदर्शनाचा समावेश

साहित्य संमेलनात प्रथमच चित्र, शिल्प प्रदर्शनाचा समावेश

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिकमध्ये होणार्‍या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात (Marathi Sahitya Sammelan) प्रथमच चित्र, शिल्प प्रदर्शनाचा समावेश करण्यात आल्याची माहिती संमेलन चित्र, शिल्प प्रदर्शन समितीच्या वतीने मुक्ता बालिगा यांनी दिली...

संमेलनाच्या निमित्ताने नाशिकच्या थोर चित्र व शिल्पकरांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने कलामहर्षी वा. गो. कुलकर्णी (V. G. Kulkarni), कलामहर्षी शिवाजी तुपे (Shivaji Tupe) व शिल्पमहर्षी मदन गर्गे (Madan Garde) यांच्यासह नाशिकमधील अन्य थोर चित्र व शिल्पकारांच्या कलाकृतींचा त्यात समावेश आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन दि. 3 डिसेंबर रोजी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट चे डीन प्रा. विश्वनाथ साबळे (Vishwanath Sable) यांच्या हस्ते होणार आहे. दि. 4 डिसेंबरला प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते (Prabhakar Kolte) हे संवाद साधणार आहेत. या प्रदर्शनात निलेश चव्हाण, वरूण भोईर, संदीप लोंढे, श्रेयस गर्गे, यतीन पंडित, मयूर मोरे यांच्या शिल्पांचा देखील समावेश असणार आहे.

नाशिक हीच आपली कर्मभूमी

यथार्थवादी शैलीत, जोमदार रंगलेपनातून जलरंग व तैलरंगाची वैशिष्ट्ये सांभाळत निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे व प्रसंगचित्रे रंगविणारे चित्रकार म्हणून वा. गो. कुलकर्णी प्रसिद्ध होते. त्यांनी नाशिकमध्ये आयुष्यभर कलाशिक्षण व कलाप्रसाराशी असलेली बांधीलकी आयुष्यभर जोपासली. भारतात होणार्‍या अनेक प्रदर्शनांतून त्यांनी सुवर्ण, रौप्यपदके, तसेच अनेक पारितोषिके मिळवली. नाशिक हीच आपली कर्मभूमी ठरवून त्यांनी तेथेच कलानिर्मिती केली व कला समाजाभिमुख करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नाशिक कला निकेतन संस्था स्थापन केली होती.

लॅण्डस्केप्स चित्रांचे वैशिष्ट्य

शिवाजी तुपे यांनी जे. जे. उपयोजित कला महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतले होते. लॅण्डस्केप्स हे त्यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य होते. जवळपास 50 वर्षांपासून ते लॅण्डस्केप्स करीत होते. तुपे यांच्या चित्रांची अनेक प्रदर्शने प्रदर्शने भरविण्यात आली आहेत. ललित कला अकादमी, बॉम्बे आर्ट सोसायटी यांनी भरविलेल्या प्रदर्शनांमध्येही तुपे यांनी सहभाग घेतला होता. वा. गो. कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या नाशिक कला निकेतन या संस्थेत 1960 ते 98 या काळात अध्यापक म्हणून तर पुढे सचिव म्हणून ते कार्यरत होते. ‘स्केच करता करता’ आणि ‘स्केचबुक’ ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

‘नाशिक भूषण’ म्हणून गौरव

नाशिक येथील सुप्रसिद्ध शिल्पकार मदन गजानन गर्गे यांनी निर्माण केलेली भव्य आकाराची स्मारकशिल्पे या उच्च दर्जाच्या कलाकृती आहेत. गर्गे यांच्या सगळ्याच शिल्पांमध्ये वास्तवता, जोरकसपणा, सहजता, गती, लावण्य, सौंदर्य आणि कलात्मकता या सर्वांचा सुंदर मिलाफ झालेला दिसतो. त्यांना रशियन व कोरियन शिल्पातील भव्यतेचे आकर्षण होते आणि त्यांच्या शिल्परचनेत त्यांच्या खुणा जाणवतात.

उदा. त्यांनी साकारलेले ‘भक्ती आणि शक्ती’ हे भव्यदिव्य शिल्प. ज्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भेट दाखवली आहे. जे पिंपरी चिंचवड येथे उभारण्यात आले आहे. मदन गर्गे यांना त्यांच्या शिल्पकलेच्या क्षेत्रातील नेत्रदीपक कामगिरीबद्दल 1998 मध्ये नाशिक रोटरी क्लबतर्फे ‘नाशिक भूषण’ म्हणून गौरविण्यात आले, तर 2003 मध्ये ‘नाशिक गौरव’ पुरस्काराने त्यांचा बहुमान करण्यात आला. त्यांच्या शिल्पकलेतील योगदानाबद्दल रवी परांजपे फाउण्डेशनतर्फे 2006 मध्ये प्रतिष्ठेचा आणि मानाचा कै. कृ.रा. परांजपे ‘गुणिजन कला पुरस्कार’ त्यांना देण्यात आला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com