साहित्य संमेलन : आंतरराष्ट्रीय चित्रकार सावंत बंधूंचे भव्यचित्र ठरले मुख्य आकर्षण

साहित्य संमेलन : आंतरराष्ट्रीय चित्रकार सावंत बंधूंचे भव्यचित्र ठरले मुख्य आकर्षण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराजवळच आंतरराष्ट्रीय चित्रकार राजेश भिमराज सावंत (Rajesh Sawant) व प्रफुल्ल सावंत (Prafull Sawant) यांच्या दिमाखदार चित्रशैलीत शैलीतील भव्यचित्र सर्व सारस्वतांचे मुख्य आकर्षणाचे केंद्र ठरले आहे...

कुसुमाग्रज नगरीचे हे मुखचित्र १५ फूट उंच व 6६० फूट लांब अशा भव्य आकाराचे असून या चित्रांचे उद्घाटन स्वागताध्यक्ष छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खा. श्रीनिवास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मराठी साहित्य संमेलनाच्या परिसराला "कुसुमाग्रज नगरी" (Kusumagraj Nagari) हे नाव देण्यात आले आहे. याच कुसुमाग्रज नगरीला आंतरराष्ट्रीय चित्रकार राजेश सावंत यांनी आपल्या बोलक्या रंग व कुंचल्यातून मराठी साहित्य क्षेत्रातील मराठी भाषेचे दैवत कविवर्य वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जीवनावर आधारित अनोखे चरित्रात्मक चित्र, संमेलनाचे मुखचित्र आपल्या अत्यंत प्रभावी चित्रशैलीत जलरंग माध्यमात चित्रित केलेले आहे,

निसर्गाच्या विराट वैभवाने संपन्न असलेल्या नाशिकनगरीच्या क्षितिजावरील साहित्यक्षेत्रातील तळपणारा अजरामर साहित्य सूर्य म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर उर्फ "कुसुमाग्रज" होय, तात्यासाहेबांच्या सृजनशील लेखणीतून साहित्य क्षेत्राच्या अवकाशाला गवसणी घालत अनेक महान अजरामर कवितासंग्रहे, कादंबऱ्या, नाटके आदींचा जन्म नाशकात झाला व त्यांच्या साहित्य निर्मितीला ज्ञानपीठ पुरस्कार ते पद्मभूषण यासारख्या अनेक सन्मानाचे क्षण याचित्रात चित्रित केले आहेत.

त्र्यंबकेश्वर येथील वैशिष्ट्यपूर्ण सह्याद्रीच्या डोंगरांच्या भव्य रांगा तात्यासाहेबांच्या साहित्या समोर नम्रपणे उभे आहेत तसेच शिरवाडकर यांच्या जीवनातील विष्णूपासून तर कुसुमाग्रजपर्यंतचे तीन मुख्य स्थित्यंतरांसह तात्यासाहेबांच्या विविध भावमुद्रा चित्रकार राजेश सावंत यांनी चित्रित करत एक चित्र कविताच जणू कुंचल्यातून साकारली आहे. अत्यंत मार्मिकपणे राजेश सावंत यांनी तात्यासाहेबांना त्यांच्या चित्रकलेच्या माध्यमातून अनोखी कृतज्ञता चित्रित केली आहे.

चित्राच्या दुसऱ्या भागात त्र्यंबकेश्वरचे पावसाळी विलोभनीय असे दृश्य आंतरराष्ट्रीय चित्रकार प्रफुल्ल सावंत यांनी आपल्या चित्रशैलीत अत्यंत जिवंतपणे कविवर्य कुसुमाग्रज यांच्या गुराखी विषयावरील आधारित कवितेचे हुबेहूब चित्रण सॉफ्ट पेस्टल या माध्यमातून साकारली आहे. संमेलनास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले जगप्रसिद्ध अमूर्त चित्रकार प्रभाकर कोलते यांनी प्रफुल्ल तुम्ही समोरील निसर्ग दृश्याच्या बाह्यआकारात न अडकता त्या स्थळाच्या अंतर मनापर्यंत पोचून दर्जेदार असे चित्रण करतात असे गौरवोद्गार काढले. चित्रकार सावंत बंधूंची अनेक सारस्वतांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना दाद दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com