ओझर । Ozar

ओझरच्या उमेश लढ्ढा या युवकाने डोळ्यांच्या आजारावरील औषधाचे संशोधन करून त्याचे पेटंट मिळवले आहे. उमेशच्या यशाने ओझरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. उमेश सध्या भुजबळ नॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट फार्मसी आडगावं येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.

उमेश याने फार्मसी क्षेत्रात शिक्षण घेत असतांनाच सन २०१४ मध्ये पेटंट रजिस्टर करून आपल्या नावावर १३ जाने २०२१ रोजी एक पेटंट नोंद केले आहे.

ओझर गावातील हे पहिलेच पेटंट असल्याचे उमेशने माहिती दिली आहे. उमेश ने सिंहगड इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसी कॉलेज ,नऱ्हे कॅम्पस येथून शिक्षण घेतले आहे. शिक्षण घेत असतानाच उमेश व त्याचा मित्र डॉ. रोहन बारसे यांनी आपले मार्गदर्शक व उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत कोकरे व फार्मसी डिपार्टमेंट प्रमुख डॉ अमोल तगलपल्लेवार यांच्या मदतीने महिना भर पुणे येथील जवळपास ५० नेत्ररोगतज्ज्ञांच्या भेटी घेत डोळ्याला होणारा ग्लुकोमा आजारावर डोळ्यात टाकले जाणारे औषधांबाबत माहिती संकलन केली. त्यानुसार महाविद्यालयातील प्रयोगशाळेत एका औषधाचा शोध लावण्यास सुरुवात केली.

सिंहगड इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसी कॉलेज, नऱ्हे येथील उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत कोकरे व फार्मसी डिपार्टमेंट प्रमुख डॉ अमोल तगलपल्लेवार तसेच विद्यार्थी डॉ रोहन बारसे,उमेश लढ्ढा यांना ग्लुकोमा या डोळ्यांच्या आजारावरील उपयुक्त संशोधनबद्दल भारत सरकारने पेटंट मंजूर केले आहे.

ह्या संशोधनामुळे ग्लुकोमावरील उपचार कमी मात्रेने औषध वापरून सुद्धा प्रभावीपणे करता येणार आहे. या संशोधनासाठी डॉ कोकरे व डॉ तगलपल्लेवार यांनी वेगवेगळ्या औषध निर्मिती कंपन्यांबरोबर पुढील संशोधन करार केले आहेत.

पेटंट प्राप्त संशोधन हे ग्लुकोमा साठी अत्यंत उपयुक्त आहे. कमी औषध वापरून सुद्धा प्रभावीपणे ग्लुकोमा चे उपचार करणे शक्य होणार आहेत. सदर संशोधन बाजारात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत.

- प्रा.उमेश लढ्ढा