ओझरला दोन दिवस बंद

करोनाच्या पार्श्वभूमीवर ११ व १२ जुलैला सर्व व्यवहार राहणार बंद
ओझरला दोन दिवस बंद

ओझर । प्रतिनिधी Ozar

येथील बाधित व्यक्तींची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने तसेच काल करोनाबाधित महिलेचा व संशयित वृद्धाचा मृत्यू झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यावर मात करण्यासाठी जि.प. सदस्य यतीन कदम यांनी ग्रामपालिका सदस्यांची व स्थानिक प्रशासन अधिकार्‍यांची बैठक बोलावली होती.

त्यात शनिवार दि.११ व रविवार दि.१२ रोजी ओझर गाव प्रायोगिक तत्वावर लॉकडाऊन करण्यात येणार असून शनिवारी व रविवारी सर्व व्यवहार बंद राहतील. त्याच बरोबर ओझरच्या परिघातील व लगतच्या गावातील शेतकरी, भाजी विक्रेते यांनी पुढील पंधरा दिवस कोणताही भाजीपाला विक्रीसाठी आणू नये असे आवाहन जि.प. सदस्य यतीन कदम यांनी केले आहे.

सुरुवातीच्या काळात जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाने ओझर आधीच लॉकडाऊन केले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाल्याने ओझरच्या माथी करोनामुक्तीचा टिळा लागला. मात्र अनलॉक होताच अखेर करोनाचा शिरकाव झालाच. आता प्रशासनाची चिंता वाढल्याने बाजारपेठेत बाहेरील भाजीपाल्याला गाव बंदीचा व शनिवार, रविवार बंदचा निर्णय घेण्यात आला असून ग्रामस्थ, दुकानदार, व्यापारी यांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यतीन कदम यांनी केले आहे.

यावेळी सरपंच जान्हवी कदम, उपसरपंच रज्जाक मुल्ला, ग्रामविकास अधिकारी डी.बी. देवकर, मंडळ अधिकारी प्रशांत तांबे, तलाठी उल्हास देशमुख आदींसह प्रशासकिय अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com