मालेगाव सामान्य रुग्णालयास ऑक्सिजन टँक उपलब्ध

कृषी मंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नांना यश
मालेगाव सामान्य रुग्णालयास ऑक्सिजन टँक उपलब्ध

मालेगाव । प्रतिनिधी

करोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य प्रशासनास भेडसावणार्‍या ऑक्सिजन तुटवड्यावर मात करण्यासाठी येथील सामान्य रुग्णालयास पूर्वी 6 के.एल. क्षमतेचा ऑक्सिजन टँक मंजूर करण्यात आला होता.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथील सामान्य रुग्णालयास दिलेल्या भेटीत येथील वाढती रुग्णसंख्या व गरजेप्रमाणे लागणारा ऑक्सिजन यामधील तफावत लक्षात घेऊन 6 के.एल.ऐवजी 20 के.एल. क्षमतेचा ऑक्सिजन टँक बसवण्याचे आश्वासन दिले होते.

त्याअनुषंगाने कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह आ. मौलाना मुफ्ती यांनी 20 के.एल.चा ऑक्सिजन टँक लवकरात लवकर मिळावा यासाठी तांत्रिक व प्रशासकीय मंजुरीसाठी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले. आज सामान्य रुग्णालयास 20 के.एल. (20 हजार लिटर) क्षमतेचा ऑक्सिजन टँक मालेगावकरांच्या सेवेत दाखल झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे यांनी दिली.

नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्व तांत्रिक बाबी तपासून आवश्यक त्या सर्व बाबींची सखोल माहिती घेऊन सदर टँकची सुविधा पुरवण्याबाबतच्या सूचना भुसे यांनी यावेळी दिल्या. तर सामान्य रुग्णालयास प्राप्त झालेला हा ऑक्सिजन टँक कार्यान्वित होण्यास 12 ते 15 दिवस लागणार असून लिक्विड ऑक्सिजनदवारे या टँकचे रिफील करण्यात येणार आहे.

या ऑक्सिजन टँकच्या माध्यमातून सामान्य रुग्णालयातील 200 बेडस्ची ऑक्सिजन पाईपलाईनद्वारे जोडणी करण्यात येणार आहे. या टँकद्वारे 100 बेडसाठी किमान 6 ते 15 दिवस पुरेल इतक्या क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक असल्याने यामुळे वेळेसह वाहतूक व मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.

याप्रसंगी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. हितेश महाले, डॉ. शिलवंत, डॉ. महेंद्र पाटील, डॉ. बरडे, रामा मिस्तरी, विनोद वाघ आदींसह सामान्य रुग्णालयातील अधिकारी व सेवक उपस्थित होते. सामान्य रुग्णालयाची गरज ओळखून 20 के.एल. ऑक्सिजन टँक उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे कृषिमंत्री दादा भुसे व आ. मौलाना मुफ्ती यांनी यावेळी आभार मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com