कळवण तालुक्यात ऑक्सिजनचा तुटवडा कायम

कळवण तालुक्यात ऑक्सिजनचा तुटवडा कायम
USER

कळवण । प्रतिनिधी

करोना संसर्गाचे प्रमाण वाढू लागल्यानंतर रुग्णांना असलेली ऑक्सिजनची गरज वाढली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून कळवणसह आदिवासी तालुक्यात कोविड सेंटर, रुग्णालय, खासगी कोविड सेंटरला ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याचे समोर आले आहे. महसूल, आरोग्य यंत्रणा, अन्न व औषध प्रशासन विभाग एकमेकांकडे बोट दाखवत टोलवाटोलवी करत असल्यामुळे आदिवासी भागातील रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे तर तालुक्यातील यंत्रणा हतबल झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन उत्पादक व पुरवठादाराकडून डुरा आणि जम्बो सिलेंडर्स भरुन मिळत नसल्याने वाहनांना माघारी फिरावे लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा यंत्रणेला आदिवासी व ग्रामीण भागात ऑक्सिजन पुरवठा करण्यास अपयश आले असून जम्बो सिलेंडर उपलब्ध करुन दिले तरी भरुन दिले जात नाही. त्यामुळे स्थानिक आरोग्य यंत्रणेचा रुग्णावर उपचाराऐवजी ऑक्सिजन मिळविण्यासाठी वेळ जात असल्यामुळे ऑक्सिजनच्या नियोजसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यन्वित करण्याची मागणी पुढे आली आहे.

कळवण, सुरगाणा, दिंडोरी, पेठ या भागात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढू लागले असून बाधित रुग्ण कोविड सेंटरमध्ये दाखल होत आहे. मात्र या तालुक्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा कायम आहे. त्याचा दुष्परिणाम रुग्णांना भोगावा लागत असून उपचारासाठी रुग्ण आणि नातवाईकांना धावपळ करावी लागत आहे. शिवाय ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने नवीन रुग्ण देखील कोविड सेंटरमध्ये दाखल करुन घेतले जात नाही

. ऑक्सिजनची गरज न भासणारे रुग्ण दाखल करुन घेण्याकडे प्राधान्य दिले जात आहे. ऑक्सिजनची पातळी कमी असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज असल्यामुळे रोज ऑक्सिजनची मागणी वाढत असल्यामुळे कोविड सेंटर, खासगी कोविड सेंटरमधून जम्बो सिलेंडर भरण्यासाठी वाहने पुरवठादाराच्या प्लांटवर उंबरठे झीझवत आहे. डुरा सिलेंडर, जम्बो सिलेंडर भरुन मिळविण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणा जिल्हा महसूल प्रशासन, जिल्हा शल्य चिकित्सक, अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या संपर्कात राहून सिलेंडर भरुन देण्याची मागणी नोंदवत आहे.

मात्र तिन्ही यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव समोर येत असल्यामुळे उत्पादक व पुरवठादाराकडून त्यामुळे मनमानी होत आहे. प्लांटवर ऑक्सिजन सिलेंडरची पळवापळव होत असल्याने आदिवासी भागात ऑक्सिजन पुरविण्यात जिल्हा प्रशासकीय यंत्रणा अपयशी ठरली असल्यामुळे ऑक्सिजन द्या हो अशी म्हणण्याची वेळ आदिवासी रुग्णावर आली आहे.

कळवण या आदिवासी तालुक्यातील अभोणा व मानूर येथे कोविड सेंटर असून दोन खासगी कोविड सेंटर सुरु आहे. कळवण तालुक्यात रोज 100 जम्बो सिलेंडर मिळणे अपेक्षित असतांना केवळ 10/20 सिलेंडर देऊन बोळवण केली जाते तर कधी काहीच मिळत नाही. हीच परिस्थिती आदिवासी तालुक्यात असून शासकीय यंत्रणा जाणूनबुजून रुग्णाच्या जीवाशी खेळ खेळीत असल्याचा आरोप जनतेने केला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com