Video : ऑक्सिजन एक्स्प्रेस नाशकात दाखल; चार टँकर उतरवले

Video : ऑक्सिजन एक्स्प्रेस नाशकात दाखल; चार टँकर उतरवले

नाशिक | प्रतिनिधी

विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन घेऊन निघालेली एक्स्प्रेस आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास नाशिकरोड रेल्वे स्थानकात दाखल झाली. देवळाली येथील मालधक्का येथे मोठ्या पोलीस बंदोबस्तात चार टँकर उतरविण्यात आले...

व्हिडीओ / फोटो : सतीश देवगिरे

विशाखापट्टणम स्टील प्लांट सायडींगमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या 7 (एलएमओ) टँकर्ससह रो-रो सेवेद्वारे ऑक्सिजन एक्सप्रेस निघाली होती. काल (दि २३) रात्री नागपूर स्थानकात 3 टँकर उतरविण्यात आले.

त्यानंतर उर्वरित टँकर नाशिक रोड स्थानकात उतरविण्यात आले. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो आहे.

अशावेळी रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेत रेल्वेद्वारे अन्य राज्यांमधून महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. यानंतर ऑक्सिजन एक्स्प्रेस विशाखापट्टणम येथे पाठविण्यात आली होती. अखेर आज ही रेल्वे नाशकात दाखल झाल्याने नाशिक, नगरमधील ऑक्सिजनचा तुटवडा याद्वारे भरून निघणार आहे.

नगरला पाठवणार दोन टँकर

आज नाशिकरोड रेल्वेस्थानकात उतरविण्यात आलेले चार टँकरपैकी दोन नाशिक जिल्ह्यासाठी तर दोन नगर जिल्ह्यासाठी आहेत. यातील दोन टँकरलगेचच नगरसाठी रवाना होणार आहेत. टँकरच्या वाहतुकीसाठी ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली असून त्याच्यामार्फत हे टँकर इच्छितस्थळी पोहोच केले जातील.

25 के.एल. च्या दोन ऑक्सिजन टँकरमुळे एकूण 50 मेट्रिक टन प्राप्त होणारा ऑक्सिजन एकाच दिवसात वापरून न संपवता, ज्याठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प आहेत, तेथे या ऑक्सिजनचा काही प्रमाणात साठा करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. जेणेकरून अतिआवश्यक समयी साठवून ठेवण्यात आलेल्या या ऑक्सिजनचा वापर करणे शक्य होईल.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com