रमेश अय्यर यांना ‘आऊटस्टँडींग सिटीझन ऑफ नाशिक' पुरस्कार

रमेश अय्यर यांना ‘आऊटस्टँडींग सिटीझन ऑफ नाशिक' पुरस्कार

नाशिक | प्रतिनिधी Nashik

निराधार, वंचीत महिला, मुले, आदिवासी, पर्यावरण आणि पशूपक्षी अशा विविध क्षेत्रांमध्ये गेल्या तीस वर्षांपासून चौफेर समाजसेवा करणारे रमेश अय्यर( Ramesh Ayyar ) हे ‘नाशिक सिटीझन्स फोरम’च्या (Nashik Citizens Forum)‘आऊटस्टँडींग सिटीझन ऑफ नाशिक’ पुरस्काराचे ('Outstanding Citizen of Nashik' Award)जुलै महिन्यातील मानकरी ठरले आहेत. आपल्या निरलस आणि अखंडीत सेवाकार्यातून समाजाला कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यास प्रवृत्त करणारे आणि त्याद्वारे हजारो जणांचे जीवन उन्नत करणारे अय्यर हे प्रसिद्धीपासून राहत असल्याने एक प्रकारे ‘अनसंग हिरो’च आहेत.

नाशिकच्या उन्नती आणि उत्थानासाठी विविध क्षेत्रांत अविरतपणे कार्यरत असणाऱ्या ज्ञात-अज्ञात व्यक्तींच्या कामाला दाद देण्यासाठी ‘नाशिक सिटीझन फोरम’तर्फे दर महिन्याला ‘आउटस्टँडींग सिटीझन ऑफ नाशिक’ हा पुरस्कार घोषित केला जातो. या पुरस्काराचे जुलै महिन्यातील मानकरी ठरलेले अय्यर यांनी सामाजिक कार्यासाठी गीव्ह वेल्फेअर ऑर्गनायझेशनची स्थापना केली आहे. मात्र केवळ आपल्या गीव्ह वेल्फेअर ऑर्गनायझेशन या संस्थेपूरतेच अय्यर यांनी स्वतःला मर्यादित ठेवलेले नाही. तर त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांत काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती यांनाही ते समरसून साथ देत असतात.

एका मोठ्या मलटीनॅशनल कंपनीतील सीईओची नोकरी सोडून नाशिकला स्थायिक होत १९९५ सालापासून समाजकार्याला रमेश अय्यर यांनी वाहून घेतले. निराधार आणि वंचित महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सबलीकरणासाठी तसेच या महिलांच्या मुलांची शैक्षणीक वाटचाल सुकर व्हावी म्हणून विविध स्तरांवर अय्यर यांनी गेल्या तीन दशकांमध्ये केलेले काम स्तिमीत करणारे आहे. त्याचप्रमाणे नाशिक परिसरातील आदिवासी बांधवांच्या उत्थानासाठी व आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठीही त्यांनी लक्षणीय काम केलेले आहे. पर्यावरणरक्षण आणि जखमी झालेले जंगली पशू आणि पक्षी यांची सुश्रृषा हेही अय्यर यांचे दीर्घकाळापासून चाललेले काम आहे.

अय्यर यांनी समाजाकडून मिळालेल्या मदतीच्या आधाराने आजवर आदिवासी भागातील शंभर शाळांना टॉयलेट बांधून दिले आहेत. तसेच आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी सुमारे दहा ठिकाणी वाचनालयेही उभारली आहेत. ठाणापाडा या आदिवासी गावात त्यांनी तीन रूमचे हे अद्ययावत वाचनालय बांधले असून, तिथे दोन टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. त्र्यंबक तालुक्यातील हरसूलपासून वीस किलोमिटर अंतरावर असलेल्या हिवाळी या आदिवासी पाड्यावरील जिल्हा परिषदेच्या आदर्श आणि एकमेवाद्वीतीय अशा शाळेचे जणू पालकत्वच अय्यर यांनी स्विकारले आहे.

या शाळेतील बालवाडीची मुले तीसपर्यंतची पाढे, तर आठवी इयत्तेपर्यंतची मुले ८११ पर्यंतचे पाढे अगदी सहज म्‍हणतात. भारतीय संविधानातील सगळीच कलमे, जगातील विविध देशांच्या राजधान्या, राष्ट्रीय महामार्गही माहिती या मुलांना तोंडपाठ आहेत. कोरोनातील काळात दोन वेगवेगळ्या विषयांचे लिखाण वहीतील डाव्‍या आणि उजव्‍या पानावर एकाच वेळी दोन्‍ही हातांनी लिहिण्याचे कौशल्य या शाळेतील मुलांना आत्मसात केले आहे. ही मुले मराठी, इंग्रजीचे वाचन, बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, तीसपर्यंत पाढे, इंग्रजीची चौदाखडी अगदी न अडखळता म्‍हणतात.

केशव गावीत नावाचे शिक्षक ही वर्षांतील ३६५ दिवस आणि दररोज १५ तास चालणारी शाळा चालवितात. गावीत यांना या अनोख्या शाळेचे स्वप्न साकारण्यासाठी अय्यर त्यांची हरतऱ्हेने मदत करत असतात. शाळेतील मुलांना सर्व प्रकारचे शैक्षणीक साहित्य आणि रात्रीचे जेवण अय्यर यांच्याकडून दिले जाते. हिवाळी गावाला स्वयंपूर्ण करण्यासाठीही शिलाई मशिन, वारली चित्रकला या माध्यमातून अय्यर यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

त्यांच्या गीव्ह या संस्थेमार्फत गावातील सर्व घरांना हिरवा रंगही देण्यात आलेला आहे. याशिवाय विविध आदीवासी गावे आणि पाड्यांवरील चार हजार मुलांना दरवर्षी युनिफॉर्म, स्वेटर, बॅग, वह्या, पुस्तके, स्टेशनरी अशा वीस वस्तूंचा संचअय्यर यांच्यामार्फत दिला जातो. गेली अनेक वर्षे हा उपक्रम अखंडीतपणे चालू आहे. कोविडमध्ये पालक गमावलेल्या काही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही त्यांनी घेतली आहे.

नाशिकमधील वेश्याव्यवसायातील महिलांच्या आरोग्यासाठी आणि त्यांना रोजगाराचे अन्य पर्याय उपलब्ध करून देण्याचेही काम अय्यर यांनी हाती घेतले आहे. अशा महिलांच्या मुलांसाठी नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्याने एक शाळाही श्री. अय्यर यांनी सुरू केली आहे. निराधार मुलांसाठी एक निवासी शाळाही ते चालवतात. नाशिकमधील मनपा शाळांना सॅनेटरी नॅपकीन व्हेंडींग मशिन्स व या नॅपकिन्सचे पर्यावरणपूरक विल्हेवाट लावणारे मशिन्स वितरीत करण्याचा उपक्रमही अय्यर यांनी हाती घेतला आहे.

पर्यावरण आणि पशूपक्ष्यांची सेवा हेही गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे कार्यक्षेत्र आहे. जखमी झालेल्या पक्ष्यांचे उपचार ते घरीच करतात. तर जंगली पशू जखमी झाल्यास त्यांच्या सुश्रृषेसाठी ते सरकारी मदतीने त्र्यंबक रोडवरील निवारागृहात काम करतात. गेल्या उन्हाळ्यात तहानलेल्या पशुपक्ष्याना प्यायला पाणी मिळावे म्हणून त्यांच्या संस्थेने विविध आकाराची सुमारे तीनशे मातीची भांडी वाटप केली होती. वृक्षलागवडीचे कार्य सातत्याने करणाऱ्या अय्यर यांनी चामरलेणी डोंगरावर सुमारे ७६६ करवंदाच्या रोपांची लागवड केली असून त्यामुळे तेथील नैसर्गिक अधिवास जपला जाणार आहे.

नाशिकमध्ये देवराई साकारताना त्याला लागणारी आर्थिक मदत उभी करण्यातही अय्यर यांचा सिंहाचा वाटा आहे. पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्यांविरोधात न्यायालयिन लढा देण्यातही ते पुढे असतात. भारतातले पहिले टेरारियम नाशिकमध्ये रमेश अय्यर यांनी साकारले आहे. टेरारियम म्हणजे हवाबंद काचेच्या पेटीत वाढवलेली वनस्पती. अय्यर यांनी या टेरारियममध्ये प्रतित्र्यंबकेश्वर साकारले आहे. यात ब्रह्मगिरीचा पर्वत आहे, नदी आहे. त्यामुळे त्यांचे घर शाळकरी मुलांसाठी एक पर्यावरणशाळाच झाली आहे. वाढणाऱ्या झाडांना केवळ हाताने गणेशाचा आकार देत आतापर्यंत त्यांनी विविध झाडांमध्ये सोळा प्रकारच्या गणेशमूर्ती साकारल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com