आमचे अनुभवविश्व समृद्ध झाले..!

काश्मीरमधील आरोग्य शिबिरात सहभागी झालेल्या डॉक्टरांच्या भावना..
आमचे अनुभवविश्व समृद्ध झाले..!

नाशिक । प्रतिनिधी

आमचा एक कॅम्प काश्मीरमधील गुरेज सेक्टरमध्ये तर दुसरा कॅम्प कुपवाडा सेक्टरमध्ये आहे. आत्ता आम्ही तुंगधार गावात आहोत. नदीच्या अलीकडे हे गाव आणि पलीकडे पाकिस्तानची सीमा आहे. आम्ही वैद्यकीय सेवेच्या उद्देशाने इथे आलो. तो उद्देश तर साध्य झालाच आहे.

पण काश्मीरला अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत आपले जवान कोणकोणत्या जबाबदार्‍या पार पाडतात याचा देखील परिचय आम्हाला झाला. आमचे अनुभव विश्व समृद्ध झाले.. अशा भावना डॉक्टरांच्या वतीने डॉ. प्रतीक्षित महाजन यांनी देशदूतशी बोलताना व्यक्त केल्या. नाशिकमधील 20 तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक काश्मीरमध्ये सैन्यदलातर्फे आयोजित आरोग्य शिबिरात सहभागी झाले आहेत. हा उपक्रम 17 मेपर्यंत सुरु राहाणार आहे.

प्रश्न : हा काय उपक्रम आहे?

उत्तर : नाशिकचे डॉक्टर्स काश्मीरच्या सीमावर्ती गावांमध्ये वैद्यकीय शिबिरांमध्ये स्थानिक नागरिकांना रुग्णसेवा देत आहेत. त्यासाठी काही तपासणी यंत्रे आणि औषधांचा साठाही बरोबर नेला आहे. हा उपक्रम मराठा बटालियन, नाशिकची इंडियन मेडिकल असोसिएशन आणि बॉर्डरलेस फाउंडेशन यांच्या वतीने घेतला जात आहे. काश्मीरमध्ये सैन्य दलाच्या वतीने दुर्गम भागातील स्थानिक नागरिकांसाठी मसद्भावनाफ मोहीम राबवली जात आहे. सध्या सुरु असलेली वैद्यकीय शिबिरे हा त्या उपक्रमाचाच एक भाग आहेत.

प्रश्न : या शिबिरांचा उद्देश सफल झाला का?

उत्तर: निश्चितच! इथल्या दुर्गम गावांमध्ये रुग्णालये नाहीत. तज्ञ डॉक्टर्सही नाहीत. एरवी इथल्या रुग्णांना काही तपासण्या आणि उपचारांसाठी थेट श्रीनगरला जावे लागते. त्यामुळेच या शिबिरांना उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. आम्ही 20 डॉक्टर्स आहोत. त्यांचे दोन ग्रुप केले आहेत. ते वेगवेगळ्या गावात कॅम्प लावतात. रोज साधारणतः 300-350 रुग्णांची तपासणी केली जाते. काहीवेळा औषधे संपली म्हणून कॅम्प लवकर बंद करावा लागतो. काही रुग्णांना पुढच्या तपासण्या कराव्या लागणार आहेत. बॉर्डरलेस फाउंडेशन त्या तपासण्यांची व्यवस्था करणार आहे. तपासण्यांचे अहवाल आम्हाला पाठवणार आहे. ते बघून मग त्या रुग्णांवर टेलिमेडिसिन पद्धतीने पुढचे उपचार केले जातील. या शिबिरांना मिळालेला काश्मिरी बांधवांचा प्रतिसाद आमचा उत्साह वाढवणाराच आहे.

प्रश्न : या शिबिराला जातानाच्या काय भावना होत्या?

उत्तर : आम्ही सगळेच खूप उत्साहित होतो. सीमावर्ती भागातील गावांमध्ये कॅम्प होणार होते. त्यामुळे थोडीशी भीती देखील वाटत होती. पण इथे आल्यावर आपल्या सैन्याची मदत पाहिली आणि ती भीती पहिल्याच दिवशी निघून गेली. आमच्या केसालाही धक्का लागणार नाही याची खात्री झाली. आमची सगळी व्यवस्था सैन्याने केली आहे. अगदी ज्या गावांमध्ये कॅम्प असतो तेथे सैन्याच्या वतीने आधी पाहाणी होते. मग जवानच आम्हाला तिकडे घेऊन जातात. हे सगळे खूपच आपुलकी निर्माण करणारे आहे.

प्रश्न : सैन्यदलाच्या सद्भावना मोहिमेविषयी विषयी काय सांगाल?

उत्तर: आपले सैनिक युद्ध लढतात अशी आपली भावना असते. पण काश्मीरसारख्या भागात त्यांना किती खडतर परिस्थितीचा, प्रतिकूल वातावरणाचा सामना करावा लागतो हे समजले. मसद्भावनाफ मोहिमेंतर्गत सीमावर्ती भागात स्थानिक विद्यार्थ्यांसाठी शाळा चालवल्या जातात. आरोग्य शिबिरे घेतली जातात. लष्करातर्फे मोफत औषधोपचाराची व्यवस्था केली जाते. दूरवरील अनेक गावांमध्ये वीज, पाणी याची सुविधा निर्माण केली जाते. रस्तेही बांधले जातात. सैनिकाचे रुटीन किती खडतर आहे हे अनुभवले.

सैनिक 24 तास बिझी असतात..

आम्ही डॉक्टर्सच खूप बिझी असतो असा आमचा समज होता. इथे आल्यावर तो आमचा भ्रम ठरला. सैनिक 24 तास बिझी असतात. त्यांच्यासाठी दिवसरात्र एकच असते. कुठूनही फोन आला तर अक्षरशः तीन मिनिटात सैनिकांच्या गाड्या रवाना होतात. जिथे आत्ता आम्ही आहोत तिथे उणे 3 डिग्री तापमान आहे. बर्फाच्या डोंगरांच्या शिखरावर तर ते अजूनच कमी असते. अशा ठिकाणी आपले सैनिक महिनोनमहिने राहातात. स्वतःचे सामान बरोबर घेऊन चढाई करतात हे समजले. सैन्याच्या एका मोहिमेचा आपण एक भाग झालो याचा अभिमानच वाटत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com