..अन्यथा कोविड सेंटरलाच कुलूप

आमदार नितीन पवार यांचा इशारा
..अन्यथा कोविड सेंटरलाच कुलूप

कळवण । प्रतिनिधी

करोना संसर्ग वेळीच रोखण्यासाठी ग्रामीण भागात करोना चाचण्या आणि वाढीव रुग्णसंख्येच्या प्रमाणात कोविड केअर सेंटरच्या सुविधा तातडीने वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने अभोणा व मानूर कोविड सेंटरला मनुष्यबळ, ऑक्सिजन व रेमडिसीव्हर इंजेक्शनचा अधिक पुरवठा करावा नाहीतर कोविड सेंटरलाच कुलूप लावू, अशा इशारा दिला आहे.

मानूर कोविड सेंटरला आ. पवार यांनी भेट दिली. मानूर व अभोणा कोविड सेंटरमधील उपाययोजनांबाबत तहसीलदार बी. ए. कापसे, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरदचंद्र परदेशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण यांच्याशी चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या. आ. पवार यांनी कोविड सेंटरमधील अडचरींबाबत जिल्हा यंत्रणेकडे पाठपुरावा करून जनतेला आरोग्य सुविधा आणि कोविड सेंटरला वैद्यकीय यंत्रणा, मशिनरी, मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.

सुविधा उपलब्ध झाल्या नाहीतर कोविड सेंटरला आपणच कुलूप लावू, असा इशारा आ. पवार यांनी यावेळी बोलताना दिला. तालुक्यात जास्त रुग्ण आढळलेल्या गावांतील सर्वांच्याच तातडीने चाचण्या करा. करोना संसर्गला रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेची अधिक व्यापक अंमलबजावणी करण्याची सूचना आ. पवार यांनी यावेळी केली.

आ. पवार यांनी कळवण शहरातील खासगी वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या यंत्रणेशी चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या. खासगी कोविड सेंटर उभारणीसाठी शासकीय पातळीवरील सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन ऑक्सिजन व रेमडिसीव्हर उपलब्ध करून देण्यासाठी आपण सहकार्य करू, असे आश्वासन यावेळी दिले. यावेळी तहसीलदार बी. ए. कापसे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, उमाकांत गायकवाड, राजेंद्र भामरे, नितीन वालखडे आदी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com