मतदार नोंदणीसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन

मतदार नोंदणीसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन

देवळा । प्रतिनिधी Deola

नवीन मतदार नोंदणी प्रक्रिया New Voters Registration Process नागरीकांपर्यंत सुलभतेने पोहचावी तसेच मतदार यादीतील नोंदींमध्ये दुरूस्ती, दुबार नावे वगळणे आदी उपाययोजनेसाठी येत्या मंगळवार (दि. 16) रोजी तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभेचे Special Gramsabha आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुर्नसर्व्हेक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे. या विशेष मोहिमेंतर्गत मतदार यादींमधील नोंदींमध्ये दुरूस्ती, नाव वगळणे तसेच नवीन नोंदणी आदी प्रक्रिया प्रत्येक गावातील नागरीकांपर्यंत सहजतेने पोहचाव्यात यासाठी 16 नोव्हेंबरला विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने आदेश दिले आहेत. त्यामुळे देवळा तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुर्नसर्व्हेक्षण करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे.

या ग्रामसभेत ग्रामपंचायतींची अस्तित्वत: असलेली मतदार यादीचे वाचन करण्यात येवून ती गावातील सर्व नागरीकांना पाहण्यासाठी-तपासण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. यावेळी सर्व नागरीकांना मतदार यादीमधील नोंदी तपासता, पाहता येतील. मतदार यादीमधील नोंदींबाबत नागरीकांना हरकती असल्यास त्यांना नोंदीमध्ये दुरूस्ती करावयाची असल्यास किंवा नाव नसलेल्या पात्र नागरीकांना त्याचे नाव नव्याने नोंदवायचे असल्यास त्यांना विहित अर्ज ग्रामसभेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या अंतर्गत मयत मतदार कायम स्थलांतरीत मतदार, लग्न होवून बाहेरगावी गेलेल्या महिलांचे नाव वगळणे, लग्न होवून आलेल्या महिला यांची नोंदणी, दिव्यांग मतदारांची नावे चिन्हांकित करणे, ज्याचे वय जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पुर्ण होत आहे त्यांची नवीन मतदार नोंदणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. ग्रामसभेत किंवा संबंधित गावातील मतदार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, नागरीकांना अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन करतील. या कामासाठी तलाठी हे सहकार्य करतील.

शक्य झाल्यास सदर ग्रामसभेमध्ये नागरीकांना ऑनलाईन नाव नोंदणी करून कशी माहिती भरता येते याबाबत मार्गदर्शन केले जाईल. नागरीकांना मतदार यादीबाबतचे कामकाज कसे चालते याची देखील माहिती मतदान अधिकारी देतील. नागरीकांना त्यांचे मतदार यादी भागाचे मतदान नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे नाव, मोबाईल नंबर याची माहिती उपलब्ध होणार असल्याने जास्तीतजास्त नागरीकांनी या ग्रामसभेत सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार सूर्यवंशी यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com