मान्सून स्कूटर रॅलीचे आयोजन

 मान्सून स्कूटर रॅलीचे आयोजन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नासिक ऑटोमोटिव्ह स्पोर्ट्स असोसिएशन (Nashik Automotive Sports Association) तर्फे शनिवार दि.17 सप्टेंबर 2022 रोजी ‘टीव्हीएस एंटॉर्क ’ नासा मान्सून स्कूटर रॅली ऑफ नासिक 2022 (Monsoon Scooter Rally of Nashik 2022) या पावसाळी स्कूटर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नासाचे दिवंगत अध्यक्ष कै. भास्कर पटवर्धन यांच्या स्मरणार्थ घेण्यात येणारी ही स्पर्धा फेडरेशन ऑफ मोटरस्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया(एफएमएससीआय) या भारत सरकारच्या मान्यताप्राप्त शिखर संस्थेच्या निकषानुसार होणार आहे .

प्रख्यात दुचाकी उत्पादक टीव्हीएस मोटार कंपनीचे मुख्य प्रायोजकत्व लाभलेली ही स्पर्धा नासिक येथील सारूळ गावातील दगडांच्या खाणीच्या परिसरात खेळवण्यात येणार आहे.या स्पर्धेसाठी केव्हज काऊंटी रिसॉर्ट , गोदाश्रद्धा फाउंडेशन , रेडिओ सिटी , मास्टर एनर्जी ड्रिंक्स आदींकडूनही प्रायोजकत्व लाभलेले आहे .

'नासा'ने ही स्पर्धा जाहीर करताच देशभरातील स्पर्धकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर, भोपाळ, बंगळुरू आदी ठिकाणच्या तब्बल 28 स्पर्धकांनी सहभाग निश्चित केला असून अजून प्रवेशिका मिळतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना रोख पारितोषिकांसह करंडक व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.नवोदित स्पर्धकांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रथमच सहभाग नोंदवणार्‍या स्पर्धकांपैकी सर्वोत्तम वेळ नोंदवणार्‍या स्पर्धकाला करंडक व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे .

विल्होळी येथील केव्हज् काऊंटी रिसॉर्ट येथे शुक्रवारी 16 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी स्पर्धेत सहभागी असणार्‍या वाहनांची तपासणी झाल्यावर समारंभपूर्वक सुरुवात करून स्पर्धकांना स्पर्धेचा मार्ग दाखवण्यात येणार आहे .एफ.एम.एस.सी. आय.चे निकष पाळले जात आहेत.यावर देखरेखीसाठी अधिकारी म्हणून प्रशांत गडकरी, मनीष चिटको , सलील दातार यांची तर वाहन तपासणीस म्हणून रवींद्र वाघचौरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे . प्रत्यक्ष स्पर्धेला शनिवार दि. 17 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 9 वाजता केव्हज् काऊंटी येथून सुरवात होईल. एकूण 30 किलोमीटर अंतरात 18 किलोमीटर अंतर हे स्पर्धात्मक असेल.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्पर्धा प्रमुख सुरज कुटे शमीम खान, अंकित गज्जर व सहकारी काम करत आहेत.

इलेक्ट्रिक स्कूटर्सचा गट

एकूण सहा गटांमध्ये विभागून घेण्यात येणार्‍या या स्पर्धेत महिला गट सुद्धा असून कदाचित भारतात प्रथमच इलेक्ट्रिक स्कूटर्सचाही एक गट असणार आहे. काईट एनर्जी प्रायव्हेट लि.या संस्थेने मॅग्नम प्रो ,मॅग्नम एक्स, काईट एक्स वन या तीन इलेक्ट्रिक स्कूटर्स च्या प्रवेशिका दाखल केल्या आहे. या शिवाय अजून प्रवेशिका अपेक्षित आहेत.

छायाचित्र स्पर्धा

या स्पर्धे दरम्यान छायाचित्रकारांसाठी विशेष स्पर्धेचे आयोजन केले आहे . दैनिकात छापून आलेल्या सर्वोत्कृष्ट छायाचित्रासाठी अनुक्रमे 3000/- 2000/- व 1000/- रुपये रोख , स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत. या छायाचित्र स्पर्धेचे निकष पुढीलप्रमाणे असणार आहे . दैनिकात छापून आलेल्या छायाचित्रासाठीच ही स्पर्धा असणार आहे. फोटोमध्ये प्रायोजक, स्पर्धेतील थरार , तसेच पारितोषिक वितरण समारंभ यांचा समावेश असणे आवश्यक आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे . या स्पर्धेसाठी छापून आलेले फोटोचे वृत्तपत्रातील कात्रण व 8 बाय 10 आकारातील फोटो हॉटेल एसएसके येथे मंगळवार दि. 20 सप्टेंबर 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जमा करावयाची आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com