
नाशिक । प्रतिनिधी Nashik
महाराष्ट्राच्या साहित्य आणि संस्कृतीसह लोककलेचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने नाशिक येथे दि.14 व दि.15 जानेवारी रोजी ‘शेकोटी’ संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी दि. 14 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता संमेलनातून लोककलावंतांना जीवनसाधना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
कमलाकर आबा देसले साहित्यनगरी भावबंधन मंगल कार्यालय नाशिक येथे आयोजित शेकोटी संमेलनात परिसंवाद, कथाकथन, अहिराणी कवी संमेलन, बालकविता संमेलन, निमंत्रित कवी संमेलन, खुले कवी संमेलन, गझल कट्टा, महिला परिसंवाद, पुस्तक प्रदर्शन, चित्र प्रदर्शन, सामूहिक हळदी- कुंकू व तीळगूळ वाटप तसेच विविध लोककलांचा अविष्कारही सादरीकरण केले जाणार आहे.
महाराष्ट्राला साहित्य आणि संस्कृतीचा मोठा वारसा आहे. मात्र त्यात अनेक लोककलावंतही रंगभूमीवरूनही बाजूला गेले आहेत. अशा लोककलावंत आणि लोप पावत चाललेले लोककलावंत, लोकसाहित्य व लोककला यांचा संगम साधत गिरणा गौरव प्रतिष्ठानने महाराष्ट्रातील पहिले शेकोटी लोककला साहित्य संमेलनाचे आयोजन केले असून, या संमेलनातून लोककलावंतांचा सन्मान करणार असल्याची माहिती या शेकोटी संमेलनाचे संमेलन अध्यक्ष शंकर बोराडे यांनी दिली.
संपूर्ण महाराष्ट्राला या शेकोटी संमेलनाची उत्सुकता असून या संमेलनात भारत सरकारने नुकताच जाहीर केलेला अमृत सन्मान जव्हार येथील तारपा वादक भिकल्या लकड्या धिंडा, तमाशा सम्राज्ञी संगीता महाडिक पुणेकर, लोकशाहीर स्वप्निल डुंबरे, लोकशाहीर सुरेशचंद्र आहेर (सिन्नर), लोकशाहीर प्रसाद अंतरवेलीकर, तमाशा सम्राट कैलास मारुती सावंत (पुणे), सुप्रसिद्ध चित्रपट संगीतकार संजय हिवराळे( मुंबई), पुस्तकांची आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिमाबाई जोंधळे (नाशिक), लोकशाहीर शिवाजीराव पाटील (जळगाव), सामाजिक बांधिलकी जपणारे विजय इंगळे (नाशिक) लोकशाहीर शिवाजी राजे ढेपले (निफाड) प्रसिद्ध पियानो वादक शहानवाज खान( येवला ) आदींना जीवनसाधना या सन्मानाने सुप्रसिद्ध लोकसाहित्य डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
आयोजित या शेकोटी संमेलनात आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यास व इतर सर्व कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागत अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रशांत पाटील संमेलन समन्वयक जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर, किरण सोनार यांनी केले आहे.