
नाशिक | प्रतिनिधी
नाशिकमधील नामवंत गिरीभ्रमणकार अर्थात ट्रेकर कै.अविनाश जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाशकात पहिले 'सह्याद्री मित्र संमेलन' होणार असल्याचे जाहीर झाले आहे. शुक्रवार दिनांक ७ जुलै २०२३ रोजी दुपारी ४ वाजता, महाकवी कालिदास कलामंदिरात ' सह्याद्री मित्र संमेलन ' आयोजित करण्यात आले आहे.दरम्यान या संमेलनाला राज्यभरातील ट्रेकर्स उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनात भारतातील नामवंत गिर्यारोहक,लेखक ‘ट्रेक व सह्याद्री ‘या पुस्तकाचे जनक.. हरिष कापडिया यांना 'सह्याद्री रत्न” या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.हरिष कापडीया एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिकमध्ये प्रथमचं येत आहेत.त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी या कारणानें नाशिककरांना उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध गिर्यारोहक,लेखक आनंद पाळंदे (पुणे) उपस्थित रहाणार आहेत.ट्रेकिंगसाठी आवश्यक माहिती असणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे उपलब्ध असणार आहेत.ते स्वतः निसर्गप्रेमी असून उत्कृष्ट ट्रेकरही आहेत.
या कार्यक्रमात इतरही काही महत्त्वाचे पुरस्कार देण्यात येणार आहेत.विशेष उल्लेखनीय कामगिरी पुरस्कार नाशिकचे नामवंत ट्रेकर व सायकलिस्ट डॉ .हितेंद्र व महेंद्र महाजन बंधूंना देण्यात येणार आहे.तसेचं सह्याद्रीच्या कुशीत घडणाऱ्या अपघात वेळी जीवावर उदार होऊन मदतीसाठी धावून जाणारी एकमेव संस्था नाशिक क्लाईंबर्स व रेस्क्यू संस्थेला ही हा विशेष उल्लेखनीय कामगिरी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.