सेंद्रिय भाजीपाला, धान्य नाशिककरांच्या दारी
नाशिक

सेंद्रिय भाजीपाला, धान्य नाशिककरांच्या दारी

रोटरी क्लब ऑफ नाशिकचा पुढाकार

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने दर महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या रविवारी गंगापूररोडवरील शंकराचार्य न्याससंकुल पार्किंगमध्ये नाशिककरांसाठी सकाळी ९ ते दुपारी १२ या कालावधीत सेंद्रिय फळे, भाजीपाला आणि धान्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा सेंद्रिय भाजीपाला पेठ, चांदवड, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी येथील शेतकरी समूहांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेला असून सर्व नाशिककरांसाठी खुला राहणार आहे.

रोटरी क्लब ऑफ नाशिक वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो.रोटरी ऑरगॅनिक बाझार हा अन्नदाता ग्रामीण, अल्पभूधारक, गरजू शेतकर्‍यांसाठी आयोजित करीत असलेला नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. यानिमित्ताने शेतकर्‍यांचा सेंद्रिय पद्धतीने उत्पादित स्वच्छ, ताज्या पालेभाज्या, वेलवर्गीय भाज्या, फळे, विदेशी भाज्या थेट कमीतकमी हाताळणी करून ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

याशिवाय ग्रामीण शेतकरी महिला, बचतगटांनी तयार केलेली घरगुती पद्धतीची पापड, कुरडई, शेवया, मसाले, सुकविलेल्या भाज्या, पंचगव्य उत्पादने, लाकडी घाण्याचे शेंग, खोबरे, बदाम, तीळ, मोहरी, करडई, सूर्यफुल,खुरासणी, एरंडतेले, हातसडी तांदूळ, सेंद्रिय गूळ ही उत्पादनेदेखील या बाजारात उपलब्ध होणार आहेत.

या माध्यमातून अत्यंत दर्जेदार शेतमाल थेट शेतकरी, महिला बचत गटाकडून ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. शेतकरी व ग्राहक यांच्यातील दलालांची साखळी कमी करून, यातून शेतकर्‍यांच्या आर्थिक फायद्यात व ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याचा उद्देश या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न रोटरी क्लब ऑफ नाशिक करणार आहे. यामुळे नाशिककरांना कोविड-१९ च्या परिस्थितीत आपले आरोग्य निरोगी ठेवण्याच्या दृष्टीने हा बाजार फलदायी ठरणार आहे.

या महोत्सवाचा लाभ जास्तीत जास्त नाशिककरांनी घ्यावा असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष मुग्धा लेले, सचिव विजय दिनानी, प्रफुल्ल बरडिया,कम्युनिटी सर्व्हिस संचालक हेमराज राजपूत, जनसंपर्क संचालक संतोष साबळे आणि रोटरी बाजार समन्वयक रफिक व्होरा यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com