सेंद्रीय शेती काळाची गरज

प्रतिपादन सेंद्रिय शेतीचे प्रचारक धनंजय वार्डेकर यांचे प्रतिपादन
सेंद्रीय शेती काळाची गरज

सिन्नर । वार्ताहर Sinnar

हरित क्रांतीनंतर रासायनिक खते (Chemical fertilizers) आणि किटकनाशकांच्या (Pesticides) अतिवापरामुळे शेतमालाच्या उत्पादनात (Agricultural products) वाढ झालेली असली तरी त्यामधून तयार होणारे अन्न (Food) आरोग्यासाठी सूरक्षित राहिलेले नाही. त्यामुळेच आज अन्न सुरक्षेबरोबरच सुरक्षित अन्नाची जास्त गरज निर्माण झाली आहे. हे सुरक्षित अन्नाचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर सेंद्रिय शेतीला (Organic farming) पर्याय असू शकत नाही असे प्रतिपादन सेंद्रिय शेतीचे प्रचारक धनंजय वार्डेकर यांनी केले.

गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भूगोल विभागाने जागतिक ओझोन दिनानिमित्त (World Ozone Day) आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. वार्डेकरांनी आपल्या शेतीत केळी, शेवगा, सोयाबीन ही पिके सेंद्रीय पध्दतीने घेतली असून त्याचे महत्व पटवून देतांना त्यांनी स्वतःचे अनुभव सांगितले.

जागतिक बाजारपेठेत अनेक वेळा भारतीय शेतमाल स्वीकारला जात नाही. शेतमालावर फवारले जाणारे किटकनाशकांचे प्रमाण जागतिक मानांकनात जास्त दिसते. आपण आपल्या पुढील पिढ्यांना अन्नाऐवजी विष खाऊ घालत आहोत. केरळ राज्यात इंडोसल्फान या औषधाच्या अतिवापरामुळे नवीन पिढीचे आरोग्याच्या दृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. पंजाब राज्यातील कॅन्सर ट्रेनही प्रसिध्द आहे. आज दवाखान्यांमध्ये वाढणार्‍या गर्दीसाठी रसायनमिश्रित आहार सर्वात जास्त जबाबदार आहे. म्हणूनच सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

ग्लोबल वार्मिंगमुळे (Global warming) पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. नैसर्गिक आपत्ती वाढत आहेत. आहार, विहार आणि व्यायामाच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. आज अन्न कमी आणि औषधेच शरीरात जास्त जात आहेत. पर्यावरण आणि आरोग्याच्या असमतोलासाठी माणूसच जबाबदार आहे. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी नैसर्गिक जीवनाकडे वळले पाहिजे.

वसुंधरेशी माणसाने आपले नाते जपले पाहिजे. त्यासाठी जाणिवजागृती होणे आवश्यक असल्याचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ म्हणाले. भूगोल विभागप्रमुख प्रा.संदिप भिसे यांनी ओझोन दिनाचे महत्व आणि पर्यावरण जागृतीविषयी माहिती दिली. सूत्रसंचलन डॉ.संतोष जाधव यांनी केले. आभार प्रा. सुजाता फडोळ यांनी मानले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. डी. एम. जाधव, आर.व्ही.पवार, स्टाफ सेक्रेटरी डॉ.एस.एन.पगार, डॉ.बी.आर.तांबे, प्राध्यापक व सेवक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com