ऑक्सिजन टँकची नियमित देखभाल करा : पालकमंत्री भुजबळ

रेमडिसीव्हर निश्चित कार्यपद्धतीप्रमाणे वितरणाच्या सूचना
ऑक्सिजन टँकची नियमित देखभाल करा : पालकमंत्री भुजबळ

नाशिक । प्रतिनिधी

डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमधील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी सर्व आरोग्य यंत्रणांनी भविष्यात घेणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमधील ऑक्सिजन टँकची नियमित दुरुस्ती व देखभाल करण्याबरोबरच राज्याकडून जिल्ह्याला रेमडिसीव्हर इंजेक्शन्स टप्प्याटप्प्याने मिळणार असून जिल्ह्यात सर्व तालुक्यांतील गरजूंना त्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे वितरण करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमधील दुर्घटनेच्या व काल रात्रीपासून लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर भुजबळ फार्म येथील आयोजित बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री भुजबळ म्हणाले, ऑक्सिजनचे व्यवस्थापन करताना देखभाल, दुरुस्तीसोबतच ड्युरा व जम्बो ऑक्सिजन सिलिंडरचीही व्यवस्था करण्यात यावी. सर्व ऑक्सिजन टँक भरण्यासाठी पाठवताना सोबत पोलीस पथकाची सुरक्षा देण्यात यावी. कुठल्याही रुग्णालयात रुग्णांना अत्यावश्यक सेवा, सुविधा, ऑक्सिजन, औषधे कमी पडणार नाहीत याची काळजी सर्व प्रशासनाने घ्यावी. त्याचप्रमाणे मनुष्यबळ वाढवण्यासाठी सेवानिवृत्त, मानवतेच्या भावनेतून स्वत:हून काम करणार्‍या अनुभवी डॉक्टर्स व परिचारिका यांना प्राधान्य देऊन त्यांची मानधन तत्त्वावर भरती करण्यात यावी, असे महापालिका आयुक्त जाधव यांना पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

राज्य शासनाने आजपासून लागू केलेल्या निर्बंधांची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचनादेखील यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com