मालेगाव । प्रतिनिधी

महानगरात मनपातर्फे सुरू करण्यात आलेले मालमत्तांचे खाजगी संस्थेमार्फत सर्व्हेक्षण जनतेवर करवाढ लादण्यासाठीच रचलेले षडयंत्र आहे. करोना संकटाने नागरीक आर्थिक विवंचनेत आहेत. त्यामुळे सर्व्हेक्षणानंतर वाढीव कराचा बोजा नागरीकांवर पडण्याची शक्यता अटळ असल्याने हे सर्व्हेक्षण प्रशासनाने त्वरीत थांबवावे, अन्यथा भाजपतर्फे तीव्र आंदोलन हाती घेतले जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष सुरेशनाना निकम यांनी दिला आहे.

मनपातर्फे शहरात मालमत्तांचे नव्याने सर्व्हेक्षणाव्दारे मोजणी केली जात आहे. अनेक घरे तसेच व्यापारी प्रतिष्ठानांची नोंदच नाही. तसेच नव्याने बांधले जात असलेल्या घरांची नोंद देखील केली जात नसल्याने मनपाचे मालमत्ता व पाणीपट्टी कराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सर्व्हेक्षण करून प्रत्येक मालमत्तेस कराची आकारणी होण्याच्या दृष्टीकोनातून मालमत्तांचे सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. तसेच सर्व्हेक्षणाअंती घरांवर वाढीव करांची आकारणी होणार असल्याची चर्चा देखील शहरात रंगल्याने जनतेत भितीचे सावट पसरले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने उपायुक्त प्रशासन नितीन कापडणीस यांची भेट घेत सर्व्हेक्षण त्वरीत थांबवावे, अशी मागणी निवेदन देत केली.

शहरात ठिकठिकाणी सर्व घरांची बांधकामांची नव्याने मोजनी केली जात आहे. सदर मोजनी कशासाठी? काही दिवसापासून शहरात घरांच्या घरपट्टीसाठी नव्याने मोजणी करणेस अधिकारी फिरत आहेत. त्यामुळे नागरिक संभ्रमात पडले असून ती मोजणी नक्की कशासाठी घेत आहे. महानगर पालिकेने याचा खुलासा करावा, अशी मागणी निकम यांनी केली. करोनामुळे प्रत्येक नागरिक आधीच आर्थिक संकटात सापडला असून त्यावर अतिरिक्त भर टाकू नये अन्यथा भाजपतर्फे सर्व्हेक्षण बंद पाडण्यात येईल, असा इशारा यावेळी देवा पाटील यांनी दिला. यावेळी हरिप्रसाद गुप्ता, नगरसेवक संजय काळे, प्रकाश मुळे, योगेश पाथरे, हेमंत पूरकर, श्याम गांगुर्डे, सलीम पिंजरी, शेख इब्राहिम, राहुल आघारकर, पप्पू पाटील, पंकज दुसाने, संदीप जाधव, सचिन कैचे, अनिल पाटील आदि उपस्थित होते.