नाशिक । Nashik

शहरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक चळवळीचे केंद्र असलेल्या इदगाह मैदानावर बस टर्मिनल उभाण्याचा निर्णय राजकीय दृष्टीने घेण्यात आला आहे.

या मैदानासमोर जिल्हा रुग्णालय असल्याने हा परिसरात ‘सायलेंट झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. बस टर्मिनल उभारल्यास वाहतूक कोंडी आणि प्रदुषणात वाढ होऊन शांतता भंग होईल. त्यामुळे या ठिकाणी बस टर्मिनल उभारण्यास संविधान प्रेमी नाशिककर संस्थेने विरोध केला आहे. याबाबत जिल्हाप्रशासनाला निवेदन देण्यात आले.

नाशिककर मोकळा श्वास घेत असलेली ही स्मार्ट सिटीच्या माध्यमातून खासगी कंपनीच्या घशात घालण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. ईदगाह मैदान हे नाशिक शहरातील प्राचिन ऐतिहासिक ठिकाण आहे. असे असताना या ठिकाणी बस टर्मिनल उभारून या मैदानाचे अस्तित्व संपुष्टात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या प्रकरणाची महसूल विभागाने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. शहराचा चौफेर विस्तार होत असताना नागरिकांना मोकळा श्वास घेण्यासाठी म्हणून या मैदानाकडे पाहिले जाते. बस टर्मिनलसाठी पर्यायी जागांचा विचार करण्यात यावा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने करण्यास बंदी असून जिल्हाधिकार्यांनी आंदोलनासाठी हे मैदान राखीव ठेवले आहे.

मात्र या ठिकाणी बस टर्मिनल उभारल्यास आंदोलनांसाठी जागा शिल्लक राहणार नाही. त्यामुळे आंदोलने चिरडण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. इदगाह मैदानावर बस टर्मिनल उभारण्याचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा रस्त्यावरील आणि न्यायालयीन लढा लढण्याचा इशारा संघटनेने निवेदनातून दिला आहे.

यावेळी किरण मोहिते, कॉ. राजू देसले, पद्माकर इंगळे, महादेव खुडे, आसिफ शेख, संतोष जाधव, नितीन मते, अॅड. नझिर काझी, अॅड. प्रभाकर वायचळे उपस्थित होते.