
नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाफेडचे ( NAFED )यावर्षी संपूर्ण देशातून 2 लाख 50 हजार टन कांदा खरेदी ( Onion Purchase )करण्याचे उद्दिष्ट असून त्यापैकी एकट्या महाराष्ट्रातून सव्वादोन लाख टन कांदा नाफेडला खरेदी करावयाचा असून शेतकर्यांना कांद्याच्या उत्पादनासाठी 20 ते 22 रुपये प्रतिकिलोला खर्च येत असताना नाफेडच्या कांदा खरेदीचा दर उत्पादन खर्चापेक्षा कमी म्हणजेच 9 ते 12 रुपये इतकाच असल्याने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा (Maharashtra State Onion Growers' Association )नाफेडच्या कांदा खरेदीला विरोध होत आहे.
याच पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.10) सायंकाळी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे संपर्कप्रमुख कुबेर जाधव, नाशिक जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, किरण मोरे, भगवान जाधव, सुभाष शिंदे, तुषार खैरनार, शेखर कापडणीस, हर्षल अहिरे, पंकज बोरसे यांच्या शिष्टमंडळाने नाफेडचे व्यवस्थापक शैलेंद्र कुमार यांना जाब विचारण्यासाठी थेट नाफेडच्या पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) येथील कार्यालयात धडक दिली.
यावेळी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी नाफेडचे व्यवस्थापक शैलेंद्र कुमार यांच्याकडे नाफेडच्या माध्यमातून राज्यातील सर्वच कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये बाजार समित्यांच्या लिलावातून थेट शेतकर्यांचा कांदा 30 रुपये प्रतिकिलोने खरेदी करावा यासह ज्या-ज्या फेडरेशनला कांदा खरेदीचे अधिकार दिले आहेत त्यांच्याकडूनही शेतकर्यांना थेट 30 रुपयांचा दर मिळावा तसेच कोणत्याही परिस्थितीत शेतकर्यांचाच कांद्याची खरेदी व्हावी आणि शेतकर्यांकडून कागदोपत्री वेगळी व प्रत्यक्ष खरेदी वेगळी अशा तक्रारी संघटनेकडे आलेल्या असल्याचे सांगितले.
लासलगाव व पिंपळगाव बसवंत बाजार समितीसह राज्यातील इतरही बाजार समितीत नाफेडने कांदा खरेदी सुरू करावी, नाफेडची संपूर्ण कांदा खरेदी ही पारदर्शक पद्धतीने केली जावी अन्यथा संपूर्ण फेडरेशनच्या कांदा खरेदीची कांदा संघटनेकडून पोलखोल केली जाईल. यामध्ये गैरप्रकार आढळल्यास नाफेडच्या अधिकार्यांना जबाबदार धरले जाईल व त्याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली जाईल, असाही इशारा यावेळी कांदा संघटनेकडून देण्यात आला आहे.