
नाशिक । प्रतिनिधी Nashik
अंजनेरी ते ब्रह्मगिरी दरम्यान रोपवे उभारण्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शवल्यानंंतर आता या 376 कोटींच्या प्रकल्पास त्रिंबक किल्ल्यावरील मेटघर ग्रामपंचायतीनेही विरोध केला आहे. मेटघर ग्रामपंचायतीने ग्रामसभेत या रोपवेविरोधात ठराव मंजूर केल्यामुळे प्रस्तावित रोपवे विरोधातील आंदोलनाला बळ मिळाले आहे.
खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून अंजनेरी ते ब्रह्मगिरी दरम्यान रोपवे उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. रोपवेसाठी 376 कोटी रुपये निधी मंजूर असून हा प्रकल्प उभारण्यासाठी निविदाही प्रसिद्ध झाल्या आहेत. टेंडरची मुदत 31 जुलैपर्यंत असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी मागील महिन्यांत दिल्यानंतर पर्यावरणप्रेमींकडून या प्रकल्पाविरोधात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या प्रकल्पामुळे जटायूंचा अधिवास, अंजनेरीची जैवविविधता, ब्रह्मगिरीची पवित्रता धोक्यात येणार असल्याची नाशिक त्र्यंबकेश्वरमधील सर्व पर्यावरण संस्थांची भूमिका आहे.
आता ब्रह्मगिरी तथा त्रिंबक किल्ल्यावरील मेटघर ग्रामस्थांनी रोपवे विरोधात ठराव केला आहे. असा ठराव करण्याची ग्रामपंचायतीची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 9 ऑगस्ट 2022 रोजी मेटघर ग्रामपंचायतीने रोपवेविरोधात ठराव केला होता. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी जटायू गिधाड पक्ष्याचे महत्त्व सांगणारा उपक्रम सुरू केला आहे.
खोरीपाडा येथील जैवविविधता व गिधाड संवर्धनासाठी प्रसिद्ध पुरस्कारप्राप्त शंकर बाबा शिंदे यांनी ग्रामस्थ, पर्यावरण प्रेमींना मार्गदर्शन करताना आयुर्वेदिक दुर्मिळ औषधी वनस्पती संवर्धनासाठी, जटायू पक्ष्यांच्या सेवेसाठी शासनाकडून राष्ट्रपती पुरस्कार दिला जात असतानाच रोपवे उभारून गिधाडे उद्ध्वस्त केली जात असल्याची खंत व्यक्त केली. त्याचवेळी या विरोधाला न जुमानता प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केल्यास पुरस्कार परत करण्याचा इशारा त्यांनी दिला.
वन्यजीव अभ्यासक जयेश पाटील यांनी सांगितले की, रायगड येथील रोपवेमुळे तेथील गिधाड नामशेष झाले. यामुळे तेथील अनुभव लक्षात घेऊन अंजनेरी ते ब्रह्मगिरी येथील रोपवेबाबत सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी केली.