कृषीपंप वीजबिल थकबाकीत सूट मिळवण्याची संधी

महाकृषी ऊर्जा अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन
कृषीपंप वीजबिल थकबाकीत सूट मिळवण्याची संधी

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

कृषी पंपाच्या वीजबिलातील agricultural pump electricity bill थकबाकीत सुमारे 66 टक्के सूट मिळविण्याची संधी राज्य शासनाने महाकृषी ऊर्जा अभियानाद्वारे Mahakrushi Urja Abhiyan दिली आहे.

. या योजनेत नाशिक जिल्ह्यातील साडेतीन लाखांहून अधिक शेतकर्‍यांच्या मूळ थकबाकीमधील 758 कोटी 96 लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. तर या शेतकर्‍यांनी चालू वीजबिल व सुधारित थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा येत्या मार्च 2022 पर्यंत भरणा केल्यास आणखी तब्बल 1 हजार 141 कोटी रुपयांची माफी मिळणार आहे.

दरम्यान वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती योजनेत सहभाग न घेणार्‍या व चालू वीजबिलांचाही भरणा न करणार्‍या शेतकर्‍यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा नाईलाजाने खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. महावितरणवरील आर्थिक संकट गंभीर असल्यामुळे शेतकर्‍यांनी किमान चालू वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महाकृषी ऊर्जा अभियानात कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुमारे 66 टक्के सूट देण्यात येत आहे. या योजनेत नाशिक जिल्ह्यातील 3 लाख 50 हजार 321 शेतकर्‍यांकडे 3 हजार 45 कोटी 52 लाख रुपयांची मूळ थकबाकी होती. त्यातील 758 कोटी 96 लाख रुपये महावितरणकडून निर्लेखन तसेच विलंब आकार व व्याजातील सवलतीद्वारे माफ करण्यात आले आहेत. तसेच वीजबिलांच्या दुरुस्तीद्वारे 4 कोटी 62 लाख रुपये समायोजित करण्यात आले आहेत. आता या शेतकर्‍यांकडे 2 हजार 281कोटीं रुपये सुधारित थकबाकी आहे.

येत्या मार्च 2022 पर्यंत त्यातील 50 टक्के म्हणजे 1 हजार 140 कोटी 98 लाख रुपये व चालू वीजबिलांचा भरणा केल्यास उर्वरित 1 हजार 140 कोटी 98 लाख रुपयेही माफ करण्यात येणार आहेत. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील 1 लाख 40 हजार 399 शेतकर्‍यांनी वीजबिल थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदविला आहे. त्यांनी 80 कोटी 18 लाखांचे चालू वीजबिल व 101 कोटी 20 लाख रुपयांच्या सुधारित थकबाकीचा भरणा केला आहे. या सर्व शेतकर्‍यांचे धोरणानुसार व्याज व दंड माफी, निर्लेखनाची सूट तसेच वीजबिल दुरुस्ती समायोजन आणि 50 टक्के थकबाकी माफीचे एकूण 352 कोटी 16 लाख रुपये माफ करण्यात आले आहेत.

वीज ग्राहकांकडे बिलांची थकबाकी मोठ्या प्रमाणात असल्याने महावितरण सद्यस्थितीत अत्यंत कठीण आर्थिक संकटात आहे. त्यामुळे कटू कारवाई टाळण्यासाठी कृषिपंपाच्या चालू वीजबिलांची रक्कम भरणे आवश्यक झाले आहे. चालू वीजबिलांचा भरणा करणार नाही, अशा कृषिपंपाचा वीजपुरवठा नाईलाजाने खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. कृषिपंपांच्या वीजबिलांतून संपूर्ण थकबाकीमुक्ती व सोबतच भरलेल्या वीजबिलांच्या 66 टक्के निधीतून गावातील वीजयंत्रणेचा विकास या दुहेरी फायद्यासाठी शेतकर्‍यांनी थकबाकीमुक्ती योजनेत सहभागी व्हावे तसेच चालू वीजबिलाचा भरणा करून वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसह आपल्या गावांतील वीज यंत्रणेचा विकास साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com