ऑपरेशन हाॅस्पिटल माेहिमेतील सदस्यांवर गुन्हे; सरकारवाडा पाेलिसांकडून तपास सुरु

ऑपरेशन हाॅस्पिटल माेहिमेतील सदस्यांवर गुन्हे; सरकारवाडा पाेलिसांकडून तपास सुरु
देशदूत न्यूज अपडेट

नाशिक | प्रतिनिधी

कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर जादा बील आकारल्याचे सांगून रुग्णालय प्रशासनास वेठीस धरुन बिलाची रक्कम न भरता निघून गेल्याप्रकरणी रुग्णाच्या नातलगांसह ऑपरेशन हॉस्पिटल मोहिमेच्या सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

सरकारवाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था हिसंक कृत्य व मालमत्तेची हानी किंवा नुकसान प्रति कायद्यासह साथरोग सुधारणा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वप्निल आटवणे, सायली आटवणे (दोघे रा. पेठरोड), जितेंद्र भावे, सोमा कुऱ्हाडे, रोहन देशपांडे या संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. विक्रांत विजन (रा. पाटील लेन, कॉलेज रोड) यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या रुग्णालयात दत्तात्रय पांडुरंग आटवणे या कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान २१ मे रोजी मृत्यू झाला होता.

त्यानंतर २२ मे रोजी सकाळी विजन रुग्णालयात संशयितांनी वाद घातला. बाह्यरुग्ण कक्षात विनाकारण गर्दी करुन रुग्णालयाने जादा बील आकारल्याचा आरोप करुन रुग्णाच्या उपचाराचे मुळ कागदपत्रे मागून रुग्णालय प्रशासनास वेठीस धरल्याचा आरोप डॉ. विजन यांनी केला.

तसेच रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना धमकावून रुग्णालयाच्या दैनंदिन कामकाजात संशयितांनी अडथळा आणला. बिलाची रक्कम न भरताच संशयित निघून गेल्याचे डॉ. विजय यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सरकारवाडा पोलीस तपास करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com