ग्रामीण भागात पहिले प्राणवायू केंद्र कार्यान्वित

खा. हेमंत गोडसेंच्या हस्ते गिरणारेत लोकार्पण
ग्रामीण भागात पहिले प्राणवायू केंद्र कार्यान्वित

देवळाली कॅम्प । वार्ताहर

करोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रुग्णांना प्राणांना मुकावे लागत आहे. तर काही कुटुंब उद्वस्त होत आहेत. त्यासाठी प्रत्येकाने सामाजिक भावनेतून या लढ्यात सहभाग नोंदविल्यास करोनाला हरविणे सहज शक्य असल्याचे प्रतिपादन खा. हेमंत गोडसे यांनी केले.

नाशिक तालुक्यातील गिरणारे येथील ग्रामीण रुग्णालयात पहिले स्वयंम निर्मित ऑक्सिजन युनिट खा. गोडसे यांच्या पुढाकाराने व नाशिक बिल्डर असोशिएशन ऑफ इंडिया, यांच्या मदतीने कार्यान्वित करण्यात आले. या युनिटचे काल (दि.6) खा. गोडसे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी माजीमंत्री व शिवसेना उपनेते बबनराव घोलप, जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात, तहसीलदार अनिल दोंडे, गटविकास अधिकारी डॉ.संगिता बारी, अभय चौकसी, विजय बाविस्कर, भाऊसाहेब सांगळे, बी.टी. कडलग, अनिल ढिकले, वामन खोसकर, दिलीप थेटे, नितीन गायकर, सदानंद नवले, अनिल थेटे, दत्तु ढगे, विवेक थेटे, महेंद्र थेटे, अविनाश पाटील, मनोज बाविस्कर, सरपंच अलकाताई दिवे, उपसरपंच तानाजी गायकर आदींसह नाशिक बिल्डर असोशिएशन ऑफ इंडियाचे पदाधिकारी व पंचक्रोषीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी खा. गोडसे यांनी सांगितले की, समाजातील प्रत्येक घटकाने करोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान देण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून पुढे आले पाहिजे. नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात करोनाने थैमान घातले आहे. ऑक्सिजन अभावी अनेकांचे बळी जात आहे. काही कुटुंब उध्वस्त झाले आहेत. यामागे रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा असलेला तुटवडा हे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे वाटेल ते करू परंतु ऑक्सिजनअभावी कोणाचा बळी जाणार नाही, याकडे सर्वाधिक लक्ष देणार असल्याचे सांगितले. बांधकाम व्यावसायिकांना ऑक्सिजन निर्मितीसाठी हाक दिल्यानंतर या क्षेत्रातील संस्थांनी केलेली मदत मौल्यवान ठरली असून ग्रामीण भागात पहिला ऑक्सिजन प्लांट कार्यन्वित झाला आहे.

पंचवीस रुग्णांना मिळणार 24 तास ऑक्सिजन

सदरचे स्वंयम निर्मित ऑक्सिजन युनिट हे बडोदा येथील कंपनीकडून खरेदी करण्यात आले आहे. या युनिटची ऑक्सिजन निमिर्तीची क्षमता प्रति तास 5 एन.एम.क्यू. इतकी म्हणजे 83 लिटर अशी आहे. या युनिटमुळे सुमारे 25 रुग्णांना चोवीस तास ऑक्सिजन उपलब्ध होणार असल्यामुळे या भागातील रुग्णांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. या मुळे गिरणारेसह पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com