नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

नाशिक शहरासह उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पोलीस विभागामार्फत कारवाई केली जाईल. तसेच विभागातील सर्व जिल्ह्यात विविध विभागांना त्यांच्याशी संबंधित प्रकरणांमध्ये कारवाई करावयाची असल्यास त्यासाठी पोलीस प्रशासनामार्फत पुरेसे पोलीस बळ उपलब्ध करून दिले जाईल, असे निर्देश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या जिल्ह्यातील व प्रादेशिक स्तरावरील प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत रविवारी बोट क्लब येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री यांनी अवैध धंद्या वरील कारवाई संदर्भात कोणताही संभ्रम न करता अशी कारवाई प्रचलित पद्धतीनुसार पोलिस विभागाने करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानूसार गमे यांनी हे पोलिस यंत्रणेला आदेश दिले.

गमे म्हणाले, साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदा या संदर्भात वेळोवेळी जारी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी क्षेत्रीय स्तरावर होते आहे किंवा कसे याबाबत दक्षता पोलीस विभागाकडून घेतली जाईल. त्याचे उल्लंघन केले गेले असल्यास त्यावर योग्य ती कारवाई पोलीस विभाग करेल. त्यासाठी कोणाच्याही तक्रारीची आवश्यकता असणार नाही असे यांनी निर्देशित केले.

बैठकीत नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील रोलेट लॉटरी, ऑनलाईन जुगार परवाने व त्या अनुषंगाने आलेल्या तक्रारी याची यथोचित दखल घेऊन पोलीस विभाग प्रभावी कारवाई करेल असा निर्णय सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. अशी कारवाई झाल्यानंतर त्याची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने अशा अवैध व्यवसायांवर अन्य विभाग देखील

त्यांच्या त्यांच्या अधिकार कक्षे नुसार पुढील कारवाई करतील असे देखील बैठकीत निश्चित करण्यात आले. बैठकीस नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दीघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, महापालिका आयुक्त कैलास जाधव जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, जिल्हा सरकारी वकील ॲड. अजय मिसर, अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्त माधुरी पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, वैधमपानशास्र विभागाचे प्रभारी उपनियंत्रक नि. प. जोशी महसूल उपायुक्त गोरक्षनाथ गाडीलकर, अर्जुन चिखले, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे आदि उपस्थित होते.