धरण
धरण
नाशिक

धरणांत वाढला अवघा ८ टक्के जलसाठा

मे अखेर ३३ टक्के : जुलै अखेर ४१ टक्के

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

गतवर्षी नाशिक जिल्ह्याला वरुण राजाने अक्षरश: धुवून काढले होते. यंदा मात्र पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे. पावसाच्या हंगामाचे जून व जुलै दोन महिने कोरडेठाक गेले आहेत. मे अखेर पर्यंत जिल्ह्यातील २४ धरणांत ३३ टक्के जलसाठा होता. मात्र पुढील दोन महिन्यात पावसाने दडी मारल्याने धरणातील जलसाठयात अवघी आठ टक्के भर पडली आहे.

सद्यस्थितीत धरणात ४१ जलासाठा असून पुढिल काळात दमदार पाऊस न झाल्यास जिल्ह्यावर 'पाणीबाणी'चे संकट नाकारता येत नाही.

मागील वर्षी पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने गोदा व दारणेला महापूर आला होता. नांदूरमध्यमेश्वर धरणातून तीन लाख क्यूसेस वेगाने विसर्ग सुरु होता. यंदा मात्र जेमतेम देखील पाऊस झाला नाही. पश्चिम पट्यात येणारे ईगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा हे तालुके पावसाचे माहेरघर समजले जातात. यंदा मात्र वरील तालुक्यात दरवर्षीच्या सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे आकडेवारीवरुन समोर येत आहे.

गंगापूर, दारणा, मुकणे, भावली या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी आहे. त्यामुळे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणार्‍या गंगापूर धरण समुहात अवघा ३७ टक्के जलसाठा आहे. तिच परिस्थिती जिल्ह्यातील इतर धरणांची आहे. मागील वर्षी आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली होती. अगदी नोव्हेंबर व डिसेंबरपर्यंत परतीचा पाऊस सुरु होता. त्यामुळे धरणे अोव्हर फ्लो होऊन पाण्याने लबालब भरली होती. त्यामुळे मे अखेर पर्यंत शेती व पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडून जिल्ह्यातील एकुण धरणांतील जलसाठा ३३ टक्के इतका होता.

त्यामुळे यंदा चांगला पाऊस झाल्यावर गतवेळीप्रमाणे पुर परिस्थिती उद्भण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र पावसाने दडी मारल्याने धरणांतील जलसाठा ३३ टक्क्यांवरुन ४१ टक्यावर पोहचला आहे. म्हणजे दोन महिन्यात जलसाठयात अवघे आठ टक्के भर पडली आहे. चार महिन्यांपैकी जुलै व आॅगस्ट हे या महिन्यात पावसाचा जोर जादा असतो. आता जुलै कोरडा गेला असून आॅगस्ट महिन्यात जोरदार पावसाची अपेक्षा आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com