मालेगावात फक्त 21 टक्के लसीकरण

अफवांवर विश्वास न ठेवता जनतेने लस घ्यावी : महापौर ताहेरा
मालेगावात फक्त 21 टक्के लसीकरण

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

करोनाच्या (Corona) पहिल्या व दुसर्‍या लाटेचा कटू अनुभव शहरवासियांना आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली असल्याने धोका टाळण्यासाठी लसीकरण (Vaccination) हाच पर्याय शिल्लक आहे. मनपा कार्यक्षेत्रात आत्तापर्यंत फक्त 21 टक्केच लसीकरण झाल्याने ते चिंताजनक आहे.

जनतेने कोणत्याही अफवांना (Rumors) बळी न पडता प्रतिबंधक लस त्वरीत घेत स्वत:बरोबर कुटूंबास देखील सुरक्षित करत शहराचे लसीकरण शंभर टक्के पुर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर ताहेरा शेख रशीद (Mayor Tahera Sheikh Rashid) यांनी येथे बोलतांना केले. करोना लसीकरणाच्या जनजागृतीसाठी (Awareness) महानगर पालिकेस सेव्ह द चिल्ड्रन्स (Save the Children) या संस्थेतर्फे दोन व्हॅन उपलब्ध करून दिल्या.

या जनजागृती वाहनांचे लोकार्पण महापौर ताहेरा शेख यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे, लेखा परिक्षक सुनिल खडके, प्रभारी सहाय्यक आयुक्त हरिष डिंबर, वैद्यकिय अधिकारी अलका भावसार आदींसह वैद्यकिय अधिकारी, सेव्ह द चिल्ड्रन्स संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

करोना बाधितांची संख्या नियंत्रणात आली असली तरी अद्याप धोका टळलेला नाही. वैद्यकिय अधिकार्‍यांसह आरोग्य सेवकांतर्फे घेतले जात असलेल्या परिश्रमामुळे शहरातील मृत्यूदर शून्य टक्क्यावर आला आहे. जनतेत देखील संक्रमण होवू नये याबाबत काळजी घेतली जात आहे. त्यामुळे पहिल्या-दुसर्‍या लाटेत हॉटस्पॉट (Hotspot) ठरलेले मालेगाव (Malegaon) शहरात गेल्या काही दिवसांपासून बाधितांची संख्या एक-दोनवर आली आहे.

या सर्व बाबी दिलासादायक असल्या तरी शहर करोनामुक्त होण्यासाठी शहरातील प्रत्येक नागरीकाचे लसीकरण होणे आवश्यक असल्याचे महापौर ताहेरा शेख यांनी स्पष्ट केले. शहरात आजमितीस 21 टक्के नागरीकांचे लसीकरण झाल्याबद्दल चिंता व्यक्त करत महापौरांनी जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. लसीकरणामुळेच आपण करोनाशी संघर्ष करू शकणार आहोत. करोनामुक्त शहरासाठी शंभर टक्के लसीकरण होणे आवश्यक आहे.

मी व माझ्या कुटूंबियांनी लसीकरण करून घेतले असून आम्ही सर्व सुरक्षित आहोत. तेव्हा ज्यांनी लस घेतलेली नाही अशा सर्व शहरवासियांनी त्वरीत आरोग्य केंद्रात जावून स्वत:सह कुटूंबियांचे लसीकरण करून घेत शहर करोनामुक्त करण्यासाठी मनपा आरोग्य यंत्रणेस सहकार्य करावे,असे आवाहन महापौर ताहेरा शेख यांनी शेवटी बोलतांना केले.

यावेळी मार्गदर्शन करतांना आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेने दिलेल्या दोन्ही वाहनांव्दारे शहरात लसीकरणासाठी जनजागृती केली जाणार असल्याचे सांगितले. पुर्व भागात उर्दु माध्यमातून तर पश्चिम भागात मराठी माध्यमातून ही जनजागृती लस घेण्यासाठी केली जाणार आहे. मनपा कार्यक्षेत्रात लसीकरणाचे प्रमाण फक्त 21 टक्के असून इतर जिल्ह्यापेक्षा ते फारच कमी प्रमाणात आहे. यात प्रथम डोस 21 टक्के झाले आहेत. ते शंभर टक्के होण्यासाठी आरोग्य यंत्रणेसह सर्व शहरवासियांची जबाबदारी असल्याचे डॉ. ठाकरे यांनी सांगितले.

शहरातील सोयगाव (Soygaon), संगमेश्वर (Sangameshwar) व कॅम्प या नागरी आरोग्य केंद्रांच्या (Civic Health Center) माध्यमातून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. वृध्द, आजारी रूग्ण जे आरोग्य केंद्रापर्यंत जावू शकत नाही त्यांचे घरी जावून लसीकरण केले जात आहे. दर मंगळवारी नागरी आरोग्य केंद्रात गरोदर मातांची तपासणी केली जात आहे. याच ठिकाणी गरोदर मातांनी देखील करोनाचे लसीकरण करून घ्यावे.

यामुळे येणारे बालक सुरक्षित राहण्याबरोबर पुढे बालकाने जन्म घेतल्यावर त्याचे नियमितपणे लसीकरण पुर्ण करून घेतल्यास बालकाचे साथीच्या आजारापासून संरक्षण होवू शकणार आहे. लसीकरणच करोनाचा धोका टाळू शकणार आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता नागरीकांनी लसीकरण करून घेत मनपा आरोग्य यंत्रणेस सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. ठाकरे यांनी पुढे बोलतांना केले.

Related Stories

No stories found.