संवाद श्वास माझा
संवाद श्वास माझा
नाशिक

'संवाद श्वास माझा'चा ऑनलाइन प्रकाशन सोहळा संपन्न

अखिल स्त्रीमुक्तीचा आवाज असणारी कविता- डॉ. प्रज्ञा दया पवार

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

डॉ. प्रतिभा जाधव यांची कविता ही सामाजिक भान व जबाबदारीची जाणीव करून देणारी, स्त्रीच्या वेदनांचा प्रदेश मांडणारी, सांस्कृतिक -सामाजिक वर्चस्ववादाशी थेट संबंध असणारी, 'सुपरवुमन'च्या दुखरेपणाची हताशा सांगणारी अशी अखिल स्त्रीमुक्तीचा आवाज असणारी आहे" असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी केले.

साहित्यिक डॉ. प्रतिभा जाधव यांच्या 'संवाद श्वास माझा' (संवेदना प्रकाशन, पुणे) या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ. प्रज्ञा पवार यांच्या हस्ते रविवार (दि.१९) जुलै २०२० रोजी Zoom cloud च्या माध्यमातून संपन्न झाले. या आगळ्या वेगळ्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी प्रसंगी डॉ. प्रतिभा जाधव यांची कविता मराठीतील महत्त्वाची असल्याचेही त्या पुढे म्हणाल्या. प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ विचारवंत प्रा. गंगाधर अहिरे (नाशिक) हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, की, डॉ. जाधव यांची कविता ही कार्यकर्त्या कवयित्रीची कविता आहे जी व्यवस्थेला प्रश्न विचारणारी सजग कविता आहे. ती कलानंदासाठीची कविता नाही तर ती जगण्यातील अस्वस्थता व्यक्त करणारी कविता आहे.

तर कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. जी. वाघ (माजी जिल्हाधिकारी, विचारवंत) यांनी डॉ.प्रज्ञा दया पवार व मल्लिका अमर शेख यांच्या नंतरचे सम्यक दलित स्त्रीवादी कवयित्री म्हणून प्रतिभा जाधव यांचा गौरव केला.सोहळयात समीक्षक प्रा. सुदाम राठोड, डॉ. प्रवीण घोडेस्वार यांनीही आपली काव्यसंग्रहविषयक निरीक्षणे नमूद केली. प्रसिद्ध कवी रवींद्र मालूंजकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले.

अलका कुलकर्णी यांनी आभार मानले. यु-ट्यूब व फेसबुक लाईव्हद्वारे मोठ्या प्रमाणात रसिक या सोहळ्यात सहभागी झाले होते. या कोरोनाच्या कठीण काळात डिजिटल प्लॅटफॉर्मवर संपन्न झालेल्या या प्रकाशन सोहळ्याचे विविध स्तरातून मान्यवर रसिक श्रोत्यांकडून कौतुक करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com