नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :

करोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन नाशिक प्रभाग समितीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ठेवण्यात येणार होती. मात्र प्रत्यक्षात ही बैठक नगरसेवकांच्या मोजक्या उपस्थित झाल्याने अवघ्या काही वेळातच प्रभाग सभा आवरली गेल्याने अधिकारी वर्गात छुपे समाधान व्यक्त केले जात होते.

दरवेळी प्रभाग सभा ही सकाळच्या सत्रात घेतली जात होती मात्र मंगळवारी स्थायी समितीच्या सभापतींची निवड असल्याने ही सभा दुपारी साडेतीन वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र अर्धा तास उशिराने म्हणजे चार वाजता ही प्रभाग सभा सुरू झाली.

यावेळी प्रभाग सभापती चंद्रकांत खाडे, नवीन नाशिक विभागीय अधिकारी मयुर पाटील, नगरसेवक सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, सुवर्णा मटाले, सुदाम ढेमसे, रत्नमला राणे, भाग्यश्री ढोमसे, छाया देवांग, भगवान दोंदे, कल्पना चुंभळे, आदींसह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रभाग क्र. 31 मध्ये रात्री-बेरात्री पाणी येत असल्याने नागरिकांना होणारा त्रास तसेच प्रभागांमध्ये कमी दाबाने पाणी येत असल्याने व ते देखील पुरेसे नसल्याने नगरसेवक सुदाम ढेमसे यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली प्रभाग क्र. 19 मध्ये देखील पाणीप्रश्न गंभीर असल्याचे नगरसेविका छाया देवांग यांनी सांगितले.

या सोबतच प्रभाग क्रमांक 28 मध्ये मोकाट कुत्र्यांचा मोठ्याप्रमाणावर त्रास होत असून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नगरसेविका सुवर्णा मटाले यांनी केली.

प्रभाग सभा संपल्यानंतर राष्ट्रगीत सुरू असतानाच शिवसेनेच्या नगरसेविका किरण दराडे आल्याने त्यांना प्रवेशद्वारावर ताटकळत उभे राहावे लागले. हजर असल्याची स्वाक्षरी माञ त्यांनी हजेरी बुकात नोंदविली. सदर प्रकार पाहून प्रभाग सभापती चंद्रकांत खाडे यांनी मस्करीच्या सुरात त्यांना लेट लतीफ असल्याची जाणीव करून दिली.