ISKCON
ISKCON|जन्माष्टमी सोहळ्याचे ऑनलाईन प्रक्षेपण
नाशिक

जन्माष्टमी सोहळ्याचे ऑनलाईन प्रक्षेपण

Vijay Gite

Vijay Gite

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

व्दारका परिसरातील आंतरराष्ट्रीय भावनामृत संघ (इस्कॉन)च्या वतीने यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा ऑनलाईन होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण यंदा सोशल मीडियाच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती इस्कॉन परिवाराच्यावतीने देण्यात आली.

यंदा करोनाच्या महासंकटामुळे सरकारने अद्याप मंदिरे उघडण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे श्रावण महिना उजाडूनदेखील कुठल्याही मंदिरांच्या आवारात भाविक उपस्थित राहू शकलेले नाहीत. या महिन्यात येणाऱ्या सणोत्सवाच्या आनंदावरदेखील करोनाच्या सावटामुळे विरजण पडले आहे.

मात्र, शहरातील सर्वच मंदिर आणि संस्थांसोबत प्रमुख श्रीकृष्ण मंदिर व्यवस्थापनाच्यावतीने यंदा जन्माष्टमीचा सोहळा ऑनलाईन प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेऊन परंपरा अबाधित राखत भाविकांच्याही दर्शनासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इस्कॉन परिवाराच्या वतीने तीन दिवसीय जन्माष्टमी सोहळ्यास (दि.११) पासून सुरूवात होणार आहे.

या सोहळ्याची सांगता (दि.१३) रोजी होणार आहे. मंगळवारी (दि.११) रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण सर्व शासकीय नियमांचे पालन करून होणार आहे. (दि.१२) रोजी बुधवारी पहाटे ५ वाजता मंगल आरती, सायंकाळी ७ ते ८ या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम, सकाळी ८ वाजेपासून पूज्य राधानाथ स्वामी यांची प्रवचन सेवा, अभिषेक, किर्तन, महाआरती असा सोहळा होईल.

(दि.१३) रोजी सायंकाळी ६ ते ८ सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री ८ वाजेनंतर प्रवचन सेवा असे कार्यक्रम होणार आहे. भाविकांना या सोहळ्याची अनुभूती ऑनलाईन पध्दतीने घेता येणार आहे.

यासाठी भाविकांनी www.facebook.com/IskconNashik या फेसबुक लिंकवर किंवा www.youtube.com/IskconTemple या यु ट्यूब ॲड्रेसवर संपर्क साधावा, असे आंतरराष्ट्रीय भावनामृत संघ (इस्कॉन) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com