पाच ऑगस्टपासून ऑनलाइन शिक्षण
नाशिक

पाच ऑगस्टपासून ऑनलाइन शिक्षण

दहा महाविद्यालयांमध्ये यंत्रणेची चाचणी; यंत्रणेला ‘एआय’ची जोड

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नव्या शैक्षणिक वर्षांचे कामकाज ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑनलाइन यंत्रणा विकसित केली असून कमी कनेक्टिव्हिटी असलेल्या भागातही ही यंत्रणा वापरणे शक्य होणार आहे. या यंत्रणेला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जोड देण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांशी संवादात्मक पद्धतीने ही यंत्रणा काम करू शकणार आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षांचे कामकाज ५ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे.

करोना काळातही शिक्षणाची प्रक्रिया निरंतर सुरू ठेवण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तीन महिन्यांत संपूर्ण नवीन यंत्रणा विकसित केली आहे. विद्यापीठाशी संलग्न दहा महाविद्यालयांमध्ये यंत्रणेची चाचणीही घेण्यात आली आहे. त्यानंतर आता अन्य संलग्न महाविद्यालयांनाही ही यंत्रणा वापरता येणार असून, टप्प्याटप्प्याने सर्व महाविद्यालये या यंत्रणेचा वापर करू शकतील.

विद्यापीठाने केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाचे स्वयम अभ्यासक्रमांचे मापन केले. हे अभ्यासक्रम विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाशी २०टक्के मिळतेजुळते आहेत. तरीही परिपूर्ण अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाकडून तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली. त्यानंतर ४० टक्के ऑनलाइन आणि ६० टक्के पारंपरिक अशी शिक्षणाची विभागणी करून ई साहित्य निर्माण करण्यास सुरुवात करण्यात आली.

प्रत्येक विद्याशाखेतील अभ्यासक्रमाचे ई साहित्य तयार करण्यात येत आहे.५ ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने या यंत्रणेचा वापर करून अध्यापनाचे कामकाज सुरू केले जाणार आहे. संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकही या ई साहित्याच्या निर्मितीमध्ये सहभागी होऊ शकतात. आतापर्यंत एक हजार तासांपेक्षा अधिक दृकश्राव्य ई साहित्य उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थी, प्राध्यापक, महाविद्यालये संकेतस्थळावरील ई साहित्याचा वापर करू शकतात.

महाविद्यालयांवर लक्ष ठेवणे शक्य

महाविद्यालयांनी ही यंत्रणा वापरण्यास सुरुवात केल्यावर विद्यापीठाला महाविद्यालयांवर लक्ष ठेवता येणार आहे. किती महाविद्यालये यंत्रणा वापरत आहेत, किती विद्यार्थी सहभागी झाले आहेत याची नोंद या यंत्रणेत घेतली जाईल.

Deshdoot
www.deshdoot.com