स्वा. सावरकर जयंतीनिमित्त ऑनलाइन भगूर दर्शन मोहीम

स्वा. सावरकर जयंतीनिमित्त ऑनलाइन भगूर दर्शन मोहीम

देवळाली कॅम्प । वार्ताहर

स्वा. वि. दा. सावरकर यांच्या 138 व्या जयंती दिनानिमित्त भगूरमध्ये विविध उपक्रमांचे ऑनलाइन आयोजन करण्यात आलेले आहे.

भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून भगूर दर्शन मोहिमेचे आयोजन करण्यात येते. या मोहिमेअंतर्गत सावरकरांच्या जीवनाशी संबंधित असलेल्या भगूरमधील विविध ठिकाणांना भेटी देऊन आलेल्या सावरकरप्रेमींना त्या ठिकाणांचे महत्त्व सांगितले जाते. 28 मे रोजी दिवसभराचा कार्यक्रम असतो.

मात्र गेल्या वर्षीपासून करोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता भगूरमध्ये मोहिमेसाठी येणार्‍या सावरकरप्रेमींची निराशा होऊ नये म्हणून समूहातर्फे यावर्षी फेसबुक व यूट्यूबच्या माध्यमातून ऑनलाइन भगूर दर्शन मोहीम दाखविली जाणार आहे. त्यासाठी समूहाने एक व्हिडीओ चित्रफित तयार केलेली असून त्यामध्ये सावरकर स्मारकात येण्यासाठी नाशिक व नाशिकरोडवरून कशी व्यवस्था आहे? भगूरमध्ये आल्यानंतर बालाजी मंदिर, सावरकर स्मारकातील सर्व ठिकाणांची माहिती, लक्ष्मीनारायण मंदिर, सावरकर संकुल, पुरातन महादेव मंदिर, ग्रामदैवत श्रीराम मंदिर, सावरकर बंधूंचे ज्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण झाले ती शाळा व अष्टभुजा देवीची मूर्ती असलेले श्री खंडेराव महाराज मंदिर अशा ठिकाणांचे चित्रीकरण करून तेथे कार्यकर्त्यांनी माहिती सांगितलेली आहे.

लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षीही अशी क्लिप सोशल मिडियावर प्रसारीत करण्यात आली होती. त्यास देशभरातून 4500 सावरकरप्रेमींनी प्रतिसाद दिलेला होता. यंदाही अशा प्रकारची क्लिप तयार करून प्रसारित करण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त सावरकरप्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे समूहातर्फे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना तसेच वक्तृत्वाची आवड असलेल्या युवकांच्या कलागुणांना वाव मिळावा, वक्तृत्व हा गुण विकसित व्हावा यासाठी भगूर देवळाली कॅम्प व आजूबाजूच्या ग्रामीण परिसरासाठी ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले असून दिनांक 23 व 24 या दिवशी ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येऊन तिचा निकाल 28 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

असे छोटे-छोटे उपक्रम सावरकर जयंतीनिमित्त राबविण्यात येणार आहे. यासाठी समूहातर्फे संयोजक मनोज कुवर, मंगेश मरकड, प्रशांत लोया, योगेश बुरके, प्रमोद आंबेकर, विजय घोडेकर, संभाजी देशमुख, संतोष मोजाड, आकाश नेहरे, सौरभ कुलकर्णी, भूषण कापसे, सार्थक मरकड, संस्कार मरकड आदी परिश्रम घेत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com