दुसर्‍या सत्र परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू

15 जूनपासून प्रॉक्टर्ड पद्धतीने परीक्षा
दुसर्‍या सत्र परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू

नाशिक । प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत सर्व अभ्यासक्रमांच्या दुसर्‍या सत्राची परीक्षा टप्प्याटप्प्याने 15 जूनपासून ऑनलाईन प्रॉक्टर्ड पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.

विद्यापीठाच्या दुसर्‍या सत्र परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठी विद्यार्थ्यांना पंधरा दिवसांत अर्ज भरावा लागणार आहे. परीक्षांचे नियोजन कमी कालावधीत योग्य पद्धतीने होण्यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वेबसाईटवरून अर्ज भरावा, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून करण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षात असणार्‍या विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळेत होण्याची आवश्यकता आहे. तसे झाल्यास विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळवता येतील, यासाठी परीक्षा लवकर घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. या पार्श्वभूमीवर परीक्षा मंडळाच्या बैठकीत सर्व अभ्यासक्रमांच्या दुसर्‍या सत्राची परीक्षा टप्प्याटप्प्याने 15 जूनपासून ऑनलाईन प्रॉक्टर्ड पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय झाला.

या परीक्षांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, दुसर्‍या सत्राच्या परीक्षेसाठी विविध अभ्यासक्रमांसाठी टप्प्याटप्प्याने ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या वेबसाईटवर लिंक देण्यात आली आहे. अभ्यासक्रमासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्याला 15 दिवसांत अर्ज भरावा लागणार आहे. परीक्षांचे नियोजन ठरलेल्या वेळापत्रकानुसार होण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांना दिलेल्या मुदतीत अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. परीक्षेबाबत सविस्तर आणि अधिकृत माहितीसाठी विद्यापीठाच्या वेबसाईटवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अर्जांवर तत्काळ कार्यवाही करावी

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जांवर महाविद्यालयांना पुढील कार्यवाही करायची आहे. त्यासाठी महाविद्यालयांना मुदत देण्यात आली आहे. परीक्षा अर्ज भरल्यानंतर कोणतीही अडचण उद्भवू नये यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाकडे संपर्क साधावा. महाविद्यालयांकडून परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडे दिलेल्या मुदतीत अर्ज न आल्यास विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचण येऊ शकते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com