
लासलगाव | वार्ताहर
गेल्या १३ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेली कांद्याची कोंडी अखेर फुटली असून कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप मागे घेतला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून उद्या मंगळवार (दि.०३ ऑक्टोबर) पासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या पुन्हा एकदा कांद्याच्या लिलावाने गजबजणार आहेत....
शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून व्यापाऱ्यांनी दोन पावलं मागे घेत मागण्या कायम ठेवत केंद्र व राज्य सरकारने एक महिन्यात निर्णय घ्यावा या अटीवर आंदोलनं मागे घेतले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाबाबतची घोषणा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केली.
व्यापाऱ्यांच्या कोर कमिटीच्या बैठकीत याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले. कांदा व्यापाऱ्यांनी आपल्या काही मागण्या सरकारसमोर ठेवल्या होत्या. यासंदर्भात दिल्लीत केंद्रीय स्तरावर बैठकही झाली. मात्र, कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर कांदा व्यापाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवलं होतं. मात्र शेतक-यांचं वाढतं नुकसान लक्षात घेऊन आता कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय व्यापा-यांनी घेतला आहे.
दरम्यान, व्यापाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी लिलाव बंद केले होते. त्यात कांदा निर्यातीवर लावण्यात आलेलं ४० टक्के निर्यात शुल्क कमी करावे ही प्रमुख मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली होती. कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावल्यामुळे राज्यातील राजकारण देखील तापले होते.