युरिया खत
युरिया खत
नाशिक

बाजारातून युरियासह कांदा बियाणे गायब

Abhay Puntambekar

निफाड। प्रतिनिधी Niphad

जिल्ह्याचा कॅलिफोर्निया समजल्या जाणार्‍या निफाड तालुक्यातील बाजारपेठांमधून युरियासह लाल व उन्हाळ कांद्याचे बियाणे हद्दपार झाले आहेत. घरगुती कांदा बियाणे १० हजार रुपये पायली तर कृषी विक्रेत्यांकडे २५०० रुपये किलोचा भाव असूनही ते बियाणे मिळणे दुरापास्त झाले आहे. युरियासह खत दुकानांत शेतकर्‍यांच्या रांगा दिसत असून मागील दाराने मात्र मुँह मांगे दाम देऊन युरियाची विक्री होत असल्याचा सूर ऐकू येत आहे. त्यामुळे कृषी विभागाने याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे बनले आहे.

तालुक्यात लाल कांदा बियाणे टाकण्याबरोबरच अनेक ठिकाणी कांदा लागवड सुरू झाली आहे. यावर्षी पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने विक्रमी कांदा लागवड होण्याचे संकेत मिळत असतानाच आता बियाणे टंचाईचे संकट वाढल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. मागील वर्षी मजूर टंचाईमुळे अनेक शेतकर्‍यांनी पेरणी करून कांदा पीक घेतले होते. मात्र यावर्षी बियाणांचा शोध घेताना शेतकरी दिसत आहेत. आताच ही परिस्थिती तेव्हा उन्हाळ कांदा लागवड कशी करावी? अशी चिंता शेतकर्‍यांना भेडसावत असल्याने आतापासून उन्हाळ कांदा बियाणे शोधमोहीम सुरू झाली आहे.

अनेक शेतकरी कन्नड येथून बियाणे खरेदी करू लागले आहेत. कारण सदरचे बियाणे हे खात्रीचे असल्याचे बोलले जाते. तसेच येथील बाजारपेठेतील बाजारभावापेक्षा कन्नड येथील बियाणे किलोमागे एक हजार रुपये कमी दराने मिळत असल्याने कन्नडच्या बियाणास शेतकर्‍यांची पसंती लाभत आहे.

कांदा बियाणांप्रमाणेच बाजारपेठेतून युरिया खत गायब झाले आहे. तर काही दुकानदार जादा भावाने युरिया विक्री करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. प्रत्येक वेळी कांदा लागवडीवेळेस खतटंचाईची समस्या गंभीर होत आहे. ज्याचा दुकानदाराकडे वशिला आहे असे शेतकरी जादा भावाने युरिया खरेदीला पसंती देत आहेत.

सध्या निफाड, पिंपळगाव, लासलगाव, सायखेडा, ओझर या प्रमुख बाजारपेठांसह खेडेगावातील सोसायट्यांमध्ये अथवा खत विक्रेत्यांकडे युरिया उपलब्ध नसल्याने शेतकर्‍यांकडून युरियाची शोधमोहीम सुरू झाली आहे. कृषी विभाग प्रत्येक हंगामात खते व बियाणांचे नियोजन करून त्याची आगावू मागणी नोंदवतो.

मात्र असे असतानाही दुकानातून खते व बियाणे गायब कशी होतात याचे उत्तर शेतकर्‍यांना मिळत नाही. खते व बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा भावाने खते व बियाणांची मागील दाराने विक्री होत असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. त्यामुळे खरी वस्तुस्थिती शेतकर्‍यांसमोर येण्यासाठी कृषी विभागाने खत व बियाणे दुकानदारांकडे उपलब्ध स्टॉकची तपासणी करावी. तसेच साठेबाजी करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com